

बोईसरकरांना आनंदवार्ता
ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीचे काम सुरू
बोईसर, ता. १४ (वार्ताहर) : दोन दशकांपासून रखडलेल्या बोईसर ग्रामीण रुग्णालयाच्या स्वतंत्र इमारतीच्या बांधकामाला अखेर सुरुवात झाली आहे. वाढती लोकसंख्या, झपाट्याने होणाऱ्या औद्योगिक विस्तारामुळे अपुऱ्या आरोग्य सुविधांमुळे त्रस्त नागरिकांसाठी ही घडामोड महत्त्वाची मानली जात आहे.
बोईसर, तारापूर औद्योगिक परिसरासह आसपासच्या अनेक गावांतील नागरिकांना दररोज बाह्यरुग्ण विभागात उपचारासाठी जावे लागते. अपुऱ्या सुविधा, मर्यादित यंत्रणा तसेच खासगी रुग्णालयांतील महागड्या उपचारांमुळे अनेकांना मुंबई, ठाणे, गुजरात किंवा सिल्वासा येथील शासकीय रुग्णालयांचा आधार घ्यावा लागत होता.
या पार्श्वभूमीवर सरावली ग्रामपंचायत हद्दीतील संजयनगर येथे महसूल विभागाची दीड एकर जागा रुग्णालयासाठी आरक्षित करण्यात आली. शासनाने २५ कोटी २९ लाख रुपयांच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता दिल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत प्रत्यक्ष कामाला वेग आला आहे. इमारतीचे बांधकाम तसेच विद्युतीकरणासाठी १९ कोटी ४१ लाख २२ हजार ८९८ रुपयांची निविदा मंजूर करण्यात आली आहे. पुढील दोन वर्षांत अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज रुग्णालयामुळे बोईसरकरांना दर्जेदार आरोग्यसेवा मिळण्याची आशा आहे.
----------------------------------
२००६ मध्ये मंजुरी
- नवापूर नाका परिसरातील खासगी इमारतीत आरोग्य सेवा देण्यात येत होती. संबंधित इमारत धोकादायक ठरल्यानंतर सहा वर्षांपासून खैरेपाडा येथील टीमा रुग्णालयाच्या इमारतीतून सेवा सुरू आहे.
- ३० खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाला शासनाने २००६ मध्ये मंजुरी दिली होती. मात्र, जागेअभावी स्वतंत्र इमारतीचा प्रश्न कायम प्रलंबित राहिला होता. गेली २० वर्षे भाडेतत्त्वावरील इमारतीत रुग्णालय सुरू होते.
-----------------------------
रुग्णालयातील प्रमुख सुविधा
- ३० खाटांचे सुसज्ज रुग्णालय
- स्वतंत्र मुख्य इमारत
- पर्जन्यजल संकलन व्यवस्था
- आधुनिक वीज, पाणीपुरवठा व्यवस्था
- सांडपाणी निचरा व्यवस्था
- अग्निशमन सुरक्षा यंत्रणा
- दूरचित्र देखरेख व्यवस्था
- अंतर्गत रस्ते व भू-सौंदर्यीकरण
- वातानुकूलित व्यवस्था
- वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी निवास व्यवस्था
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.