भूमिपुत्रांसाठी सोमवारी कौशल्य प्रशिक्षणावर मार्गदर्शन

भूमिपुत्रांसाठी सोमवारी कौशल्य प्रशिक्षणावर मार्गदर्शन
Published on

डोंबिवली, ता. १४ : श्री मलंगगड ते शीळफाटा परिसरातील गावांमधील भूमिपूत्र तरुण-तरुणींना व्यावसायिक कौशल्य प्रशिक्षण आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आगरी युथ फोरम आणि लोढा फाउंडेशन यांनी पुढाकार घेतला आहे. या उपक्रमांतर्गत प्रशिक्षण व रोजगाराच्या संधींबाबत माहिती देण्यासाठी मानपाडा येथील श्री मानपाडेश्वर मंदिरात सोमवारी (ता. १८) सायंकाळी ४.३० वाजता विशेष मार्गदर्शन सभा घेण्यात येणार आहे. या सभेत राज्याच्या व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे माजी संचालक दिगंबर दळवी उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. तरुणांना रोजगारक्षम बनवण्यासाठी विविध कौशल्याधारित प्रशिक्षण, रोजगाराच्या संधी; तसेच उद्योग क्षेत्रातील आवश्यक कौशल्यांबाबत माहिती दिली जाणार आहे. डोंबिवलीतील आगरी युथ फोरमच्या प्रयत्नांतून आणि लोढा फाउंडेशनच्या सहकार्याने ‘लोढा स्किल अँड एम्प्लॉयमेंट अकादमी’ सुरू केली आहे. अकादमीमार्फत तरुण-तरुणींना मोफत कौशल्य प्रशिक्षण आणि रोजगार सहाय्याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. प्रशिक्षण उपक्रमाची सविस्तर माहिती भूमिपूत्र युवक-युवतींपर्यंत पोहोचावी, यासाठी ही सभा महत्त्वाची ठरणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. या सभेला राजकीय, सामाजिक आणि आध्यात्मिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांसह परिसरातील भूमिपूत्र तरुण-तरुणींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन गुलाब वझे यांनी केले आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com