

‘पेट्रोल उपलब्ध नाही’
दरवाढीच्या अफवेमुळे खारघरमध्ये पंपांवर झुंबड
खारघर, ता. १४ (बातमीदार) : पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी वाढ होणार असल्याच्या अफवेने खारघर शहरात बुधवारी (ता. १३) रात्रीपासून खळबळ उडाली आहे. सेक्टर १२ मधील एका पेट्रोलपंपावर ‘पेट्रोल उपलब्ध नाही’ असे फलक लागल्याने आणि समाजमाध्यमावर दरवाढीचे संदेश व्हायरल झाल्याने नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला. परिणामी, शहरातील विविध पेट्रोलपंपांवर वाहनधारकांनी आपल्या गाड्यांचे टँक फुल करण्यासाठी मोठी गर्दी केली आहे.
खारघरमधील शहीद मुकेश जाधव पंपावर पेट्रोल नसल्याचे फलक आणि पेट्रोल दरात मोठी वाढ होणार असल्याचे संदेश समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. या अफवेचा थेट परिणाम पेट्रोलपंपांवर दिसून आला असून, खारघर सेक्टर २, १२ आणि सेक्टर १४ या पेट्रोलपंपांवर अचानक ग्राहकांची संख्या वाढली. गर्दीमुळे काही ठिकाणी वाहतूक कोंडीची परिस्थिती निर्माण झाली होती. पेट्रोल भरण्यासाठी वाहनचालकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. काही ठिकाणी पेट्रोल संपणार असल्याच्या चर्चेमुळे नागरिक अधिकच घाबरलेले दिसून आले. दरम्यान, काही जाणकारांनी नागरिकांनी समाज माध्यमांवरील अप्रमाणित संदेशांवर विश्वास ठेवू नये. तसेच, अधिकृत माहितीकडेच लक्ष द्यावे, असे आवाहन केले आहे.
दरवाढीबाबत कोणतीही घोषणा नाही
खारघर सेक्टर १२ आणि १४ येथील पेट्रोलपंपावर विचारणा केली असता, अधिकृतरीत्या पेट्रोल दरवाढीबाबत कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र, पंपावर येणारे चालक वाहनाचे टॅंक फुल करण्यासाठी गर्दी करत असल्याचे सांगितले. यासंदर्भात शाहिद मुकेश जाधव पेट्रोलपंपावर विचारणा केली असता, पेट्रोलपुरवठा न झाल्यामुळे सहा दिवसांपासून पंप बंद असून, पुढील दोन ते तीन दिवसांत सुरू होईल, असे सांगितले.
इंधनाच्या दरात वाढ होणार असल्याच्या अफवांमुळे वाहनचालकांची इंधन भरण्यासाठी गर्दी होताना दिसत आहे. पेट्रोलच्या दरात वाढ झालेली नाही. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये.
- नरेंद्र पाटील, शहीद योगेश पाटील, पेट्रोलपंपचालक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.