धोकादायक इमारतींचे माहेरघर!

धोकादायक इमारतींचे माहेरघर!
Published on

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १४ : गेल्या काही वर्षांत अतिधोकादायक आणि धोकादायक इमारतींच्या संख्येत वाढ होत असल्याने धोकादायक इमारतींचे माहेरघर म्हणून नवी ओळख जिल्ह्याची निर्माण होऊ लागली आहे. जिल्ह्यातील सात महापालिका आणि दोन नगर परिषदांमध्ये आठ हजार ३०२ धोकादायक इमारती आहेत. यामध्ये ७०२ इमारती या अतिधोकादायक असल्याची बाब समोर आली आहे. केवळ भिवंडीमध्ये २८९ अतिधोकादायक इमारती असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात या इमारतींमधील रहिवाशांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्याचे मोठे आव्हान जिल्हा, तसेच पालिका प्रशासनासमोर असणार आहे.

ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागाला गेल्या काही वर्षांपासून शहरी करण्याचे वेध लागले आहे. पूर्वी शेणाने सारवलेल्या भिंती, कौलारू घरे, अशी काहीशी ग्रामीण भागाची ओळख होती. मात्र, आता ग्रामीण भागातदेखील इमारती उभ्या राहू लागल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण भागाचेदेखील गावपण कमी होऊ लागले आहे. अशातच दुसरीकडे शहरी भागाचा वाढता विस्तार उभ्या राहणाऱ्या टोलेजंग इमारती उभ्या राहत आहेत. असे असले तरी, शहरी भागासह ग्रामीण भागात अतिधोकादायक व धोकादायक इमारतींचे जाळे निर्माण झाले आहे. त्यातच सोमवारी (ता. ११) जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या माॅन्सूनपूर्व आढावा बैठकीत ठाणे जिल्ह्यात आठ हजार ३०२ इमारती धोकादायक असल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या माध्यमातून देण्यात आली.

‘कुळगाव-बदलापूर’ धोकादायकमुक्त
ठाणे जिल्ह्यातील सात महापालिका व दोन नगर परिषद क्षेत्रात मागील वर्षी ७०० इमारती अतिधोकादायक होत्या. मात्र, यंदाच्या वर्षी त्यात दोनने भर पडल्याने संख्या ७०२ वर पोहोचली आहे. यामध्ये सर्वाधिक २८९ इमारती या भिवंडी महापालिका क्षेत्रात आढळून आल्या आहेत. सर्वात कमी म्हणजे अवघी एक अतिधोकादायक इमारत उल्हासनगर पालिका क्षेत्रात आहे, तर कुळगाव-बदलापूर नगर परिषदेमध्ये एकही इमारत धोकादायक नसल्याची माहिती समोर आली.

नवी मुंबई, मिरा-भाईंदरमध्ये संख्येत घट
एकीकडे ठाणे जिल्ह्यात अतिधोकादायक इमारतींच्या संख्येमध्ये मागील वर्षीच्या तुलनेत दोनने वाढ झाली, तर दुसरीकडे नवी मुंबई पालिका क्षेत्रात मागील वर्षी ६६ अतिधोकादायक इमारती होत्या. त्यात घट होऊन त्याची संख्या ६० वर आली आहे, तर मिरा-भाईंदर पालिका क्षेत्रातदेखील मागील वर्षी ४६ अतिधोकादायक इमारती होत्या. त्यात घट होऊन त्याची संख्या ३८ वर आली आहे. तसेच कल्याण-डोंबिवली पालिका क्षेत्रात अतिधोकादायक इमारतींच्या संख्येत यंदा दोनने वाढ झाल्यामुळे ही संख्या १९२ वर पोहोचली आहे.

ठाणे जिल्ह्यातील अतिधोकादायक इमारतींची आकडेवारी
महापालिका क्षेत्र अतिधोकादायक इमारती
ठाणे ९३
नवी मुंबई ६०
मिरा-भाईंदर ४६
कल्याण-डोंबिवली १९२
भिवंडी २८९
उल्हासनगर ०१

अंबरनाथ नगर परिषद २०
कुळगाव-बदलापूर नगर परिषद ००

मुरबाड नगर पंचायत ०९

एकूण ७०२

इमारतींची वर्गवारी
अतिधोकादायक ७०२
धोकादायक १,७६७
मोठ्या दुरुस्तीची आवश्यकता ३,८६४
किरकोळ दुरुस्ती आवश्यक १,९८७

Marathi News Esakal
www.esakal.com