

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १४ : ‘तलावांचे शहर’ अशी ओळख असलेल्या ठाण्यातील तलावांच्या संवर्धन आणि सुशोभीकरणासाठी महापालिका प्रशासनाने हालचाली वेगाने सुरू केल्या आहेत. राज्य सरोवर संवर्धन योजनेच्या पार्श्वभूमीवर महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी बुधवारी (ता. १३) विविध तलावांची पाहणी करत प्रशासनाची अक्षरशः झाडाझडती घेतली. तलाव परिसरातील अस्वच्छता, अपुऱ्या सुविधा आणि रखडलेल्या कामांवर नाराजी व्यक्त करत त्यांनी अधिकाऱ्यांना तातडीने कामे पूर्ण करण्याचे आदेश दिले.
कचराळी तलावापासून या पाहणी दौऱ्याला सुरुवात झाली. त्यानंतर सिद्धेश्वर, मखमली, ब्रह्माळा, घोसाळे, मदार्डे आणि गोकुळनगर तलावांची पाहणी करण्यात आली. तलाव परिसरातील शौचालयांची दुरवस्था, गाळ साचणे, सुरक्षेचा अभाव, तुटलेली शेड्स, अनियमित स्वच्छता आणि राडारोड्याचा प्रश्न यावर महापौरांनी संबंधित विभागांना फैलावर घेतले. कचराळी तलाव परिसरातील विद्युत डीपी हलविणे, तलावातून गेलेल्या इंटरनेट केबल्स काढणे आणि सार्वजनिक शौचालयांची नियमित स्वच्छता राखण्याच्या सूचना देण्यात आल्या.
सिद्धेश्वर तलाव परिसरातील उद्यानाची दुरवस्था पाहून महापौरांनी नाराजी व्यक्त केली. ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या शेडची दुरुस्ती, परिसरातील सांडपाण्यासाठी गटार व्यवस्था आणि कचरा उचलण्याची नियमित यंत्रणा उभारण्याचे निर्देश देण्यात आले. या वेळी उपमहापौर कृष्णा पाटील, सभागृह नेते हणमंत जगदाळे, स्थानिक नगरसेवक तसेच महापालिकेचे पर्यावरण, अभियांत्रिकी आणि स्वच्छता विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
सुरक्षा रक्षक नेमणार
मखमली तलावातील गाळ काढणे, संरक्षण भिंत उभारणे आणि कारंजे बसविण्याचे काम हाती घेण्याचे आदेश देण्यात आले. ब्रह्माळा तलाव परिसरात अतिरिक्त शौचालय उभारणे आणि सुरक्षा रक्षक नेमण्याबाबतही सूचना करण्यात आल्या. गोकुळनगर तलाव परिसरातील राडारोडा हटवून गाळ काढण्याची गरज उपमहापौर कृष्णा पाटील यांनी अधोरेखित केली.
त्रुटी दूर करण्याचे आदेश
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून ‘एकात्मिक तलाव संवर्धन’ उपक्रम राबविण्यात येत असून, तलावांचे पर्यावरणीय संतुलन राखत नागरिकांना अधिक सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर दिला जात असल्याचे महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी सांगितले. पाहणीदरम्यान आढळलेल्या सर्व त्रुटी तातडीने दूर करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
कामे अंतिम टप्प्यात
‘अमृत २.०’ योजनेंतर्गत शहरातील १५ तलावांच्या संवर्धनाची कामे अंतिम टप्प्यात पोहोचली असून, राज्य सरोवर संवर्धन योजनेंतर्गत आणखी सहा तलावांच्या विकासासाठी निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याची माहिती मुख्य पर्यावरण अधिकारी मनिषा प्रधान यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.