

उन्हाळी सुट्टीत घरफोड्यांचा धुमाकूळ!
नवी मुंबईत एकाच दिवसात तीन ठिकाणी डल्ला; लाखोंचा ऐवज लंपास
नवी मुंबई, ता. १४ (वार्ताहर) : उन्हाळ्याच्या सुट्टीत नागरिक सहलीसाठी किंवा गावी जात असल्याचा फायदा घेत चोरट्यांनी नवी मुंबईत धुमाकूळ घातला आहे. शहरात बुधवारी (ता. १३) या एकाच दिवसात घरफोडीच्या तीन मोठ्या घटना समोर आल्या आहेत. चोरट्यांनी बंद घरांचे कुलूप तोडून लाखो रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड लंपास केली आहे. या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
भरदिवसा उरणमधील द्रोणागिरी परिसरातील हरीसखा अपार्टमेंटमध्ये घरफोडी करून सुमारे पाच लाखांच्या किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले आहेत. याबाबत उरण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर चोरट्यांनी बेलापूरमधील दिवाळे गावातील मंगलदीप सोसायटीत कन्हैयाकुमार सिंग यांचे घर फोडून तब्बल १० लाख ९१ हजार किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने तसेच पेन ड्राइव्ह, हार्डडिस्क व डेबिट कार्ड, क्रेडीट कार्ड असा ऐवज चोरून नेला आहे. सिंग कुटुंबीय आपल्या मूळ गावी गेल्याची संधी साधून चोरट्यांनी डाव साधला. एनआरआय पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. तसेच, कोपरखैरणे सेक्टर-२ मधील हनुमान मंदिरालगत असलेले घर फोडून सहा लाख १८ हजार किमतीचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली आहे.
पोलिसांचे नागरिकांना सतर्कतेचे आवाहन
पोलिसांनी गुन्हे नोंदवून सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने चोरांचा शोध सुरू केला आहे. एकाच दिवसात झालेल्या या तीन घटनांमुळे पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. बाहेरगावी जाताना मौल्यवान वस्तू घरात ठेवू नका आणि स्थानिक पोलिस ठाण्याला याची माहिती द्या, असे आवाहन नवी मुंबई पोलिसांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.