

पुनर्विकास प्रकल्पाचा म्हाडाकडून आढावा
बीडीडी चाळ, कन्नमवारनगरची सीईओ जयस्वाल यांच्याकडून पाहणी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १४ ः वरळी, ना. म. जोशी मार्ग, नायगाव येथील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाचे काम वेगात सुरू आहे. त्याला आज म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी भेट देत पाहणी केली. तसेच कन्नमवारनगर-विक्रोळी (पूर्व) प्रकल्पाचीही प्रत्यक्ष पाहणी करून कामाचा आढावा घेतला. या प्रकल्पाच्या कामाच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड करू नये, प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याबाबतही त्यांनी निर्देश दिले.
वरळी येथील प्रगतिपथावर असलेल्या बांधकामाची पाहणी केल्यानंतर जयस्वाल यांनी नुकत्याच सदनिका वितरित करण्यात आलेल्या तीन लाभार्थ्यांच्या घरी भेट देत त्यांच्याशी संवाद साधला. या वेळी लाभार्थ्यांनी नव्या सदनिकांच्या बांधकामाचा दर्जा, प्रशस्त रचना, स्वच्छ परिसर आणि उपलब्ध आधुनिक सोयीसुविधांबाबत समाधान व्यक्त केले. दरम्यान, जयस्वाल यांनी ना. म. जोशी मार्ग व नायगाव बीडीडी चाळ पुनर्वसन प्रकल्पस्थळांनादेखील भेट दिली व बांधकामाची पाहणी केली. या वेळीही म्हाडाचे अधिकारी उपस्थित होते.
जीवनशैलीत परिवर्तन
नव्या घरांमुळे जीवनमानात मोठा सकारात्मक बदल झाला आहे. मुलांना अभ्यासासाठी स्वतंत्र जागा, महिलांसाठी अधिक सुरक्षित आणि स्वच्छ वातावरण, तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी अधिक सोयीस्कर सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. काही रहिवाशांनी पुनर्विकासामुळे केवळ घर बदलले नाही, तर संपूर्ण जीवनशैलीतच सकारात्मक परिवर्तन घडल्याची भावना व्यक्त केली.