भूमी वर्ल्ड अनधिकृत बांधकामावरून भिवंडीत राजकीय आरोप-प्रत्यारोप

भूमी वर्ल्ड अनधिकृत बांधकामावरून 
भिवंडीत राजकीय आरोप-प्रत्यारोप
Published on

‘भूमी वर्ल्ड’ अनधिकृत बांधकामावरून
भिवंडीत राजकीय आरोप-प्रत्यारोप

भिवंडी, ता. १४ (वार्ताहर) : पिंपळास येथील ‘भूमी वर्ल्ड’ विकसकाच्या कथित अनधिकृत बांधकामावरून भिवंडीतील राजकारण चांगलेच तापले आहे. खासदार सुरेश म्हात्रे ऊर्फ बाळ्या मामा यांनी या प्रकरणात माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्यावर अप्रत्यक्ष आरोप केल्यानंतर, कपिल पाटील यांनी पत्रकार परिषद घेत त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
‘भूमी वर्ल्ड’ विकसकाने शासकीय जागेवर अनधिकृत मॉल आणि गोदाम उभारल्याचा आरोप खासदार म्हात्रे यांनी केला होता. तसेच या बांधकामामागे काही राजकीय पाठबळ असल्याचे सूचक विधानही त्यांनी केले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना कपिल पाटील म्हणाले, की ‘शासकीय जागेवर बांधकाम झाले असेल तर कारवाई व्हायलाच हवी; मात्र वारंवार माझे नाव पुढे करून मला बदनाम करण्याचा प्रयत्न होत आहे.’ या वेळी त्यांनी खासदार म्हात्रे यांच्यावरही निशाणा साधला. ‘एमएमआरडीएच्या कारवाईपासून बचाव करण्यासाठी कोर्टातून स्थगिती घेण्यात आली. याचा अर्थ स्वतःचे बांधकाम अनधिकृत असल्याचे मान्य केले आहे. आधी स्वतःचे अनधिकृत बांधकाम पाडा, मग इतरांवर बोट ठेवा,’ असा टोला त्यांनी लगावला.
‘विद्यमान खासदारांच्या उमेदवारीपूर्वीच एमएमआरडीएने नोटीस बजावली होती,’ असा दावा करत कपिल पाटील यांनी पुरावे सादर करण्याचे आव्हानही दिले. ‘मी २००७ पासून एमएमआरडीएच्या विषयावर काम करत आहे. त्या काळात आरोप करणाऱ्यांचा राजकारणात जन्मही झाला नव्हता,’ अशी टीकाही त्यांनी केली.
भिवंडी परिसरात सात वर्षे एमएमआरडीएचा विकास आराखडा प्रभावीपणे अस्तित्वात नसल्याने अनेक शेतकरी व व्यापाऱ्यांनी ग्रामपंचायतींच्या परवानग्यांवर गोदामे उभारल्याचे त्यांनी सांगितले. ‘रोजगार निर्मितीसाठी अनेकांनी गोदामे उभारली; मात्र शासनाने त्यांना अधिकृत करण्यासाठी प्रयत्न अपुरे ठरले. तरीही शासकीय जागा बळकावण्याचा प्रयत्न झाल्यास कठोर कारवाई व्हायलाच हवी,’ असेही त्यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com