ठाण्यात ५४ शौचालयांचा कायापालट

ठाण्यात ५४ शौचालयांचा कायापालट
Published on

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १५ : ठाणे महापालिका क्षेत्रातील जीर्ण, नादुरुस्त आणि धोकादायक अवस्थेतील सार्वजनिक शौचालयांचे पुनर्बांधकाम करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. यासाठी राज्य सरकारकडून ३५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. शहरातील तब्बल ५४ सार्वजनिक शौचालयांचे आधुनिक सुविधांसह पुनर्निर्माण करण्यात येणार आहे. महापालिका क्षेत्रात मूलभूत सोयीसुविधांच्या विकासासाठी विशेष तरतूद या योजनेंतर्गत हा प्रकल्प राबविण्यात येणार असून, संबंधित प्रस्ताव शुक्रवारी होणाऱ्या महासभेच्या मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे.
शहरातील अनेक सार्वजनिक आणि सामुदायिक शौचालयांची अवस्था सध्या अत्यंत खराब झाली आहे. सततचा वापर, अपुरी देखभाल आणि वाढती लोकसंख्या यामुळे अनेक ठिकाणी गळती, तुटलेले स्लॅब, खराब जलनिस्सारण व्यवस्था, अस्वच्छता तसेच सुरक्षेचे प्रश्न निर्माण झाले आहेत. यामुळे नागरिक आणि लोकप्रतिनिधींकडून वारंवार तक्रारी करण्यात येत होत्या. पालिकेकडून वेळोवेळी किरकोळ दुरुस्ती केली जात असली, तरी काही शौचालयांची अवस्था इतकी गंभीर झाली आहे की दुरुस्तीऐवजी संपूर्ण पुनर्बांधणी आवश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यानुसार राज्य सरकारच्या २५ ऑगस्ट २०२५ रोजीच्या शासन निर्णयानुसार हा निधी मंजूर करण्यात आला आहे. या प्रकल्पाचा संपूर्ण खर्च राज्य सरकार उचलणार असून कामाची अंमलबजावणी ठाणे महापालिकेमार्फत केली जाणार आहे. या प्रकल्पामुळे शहरातील सार्वजनिक स्वच्छता व्यवस्थेत मोठी सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

या प्रभागांचा समावेश
प्रकल्पाअंतर्गत वर्तकनगर, उथळसर, नौपाडा-कोपरी, माजिवडा-मानपाडा, वागळे, कळवा, दिवा आणि मुंब्रा या प्रमुख प्रभाग समित्यांमधील शौचालयांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच, उथळसर, पाचपाखाडी, राबोडी, आनंदनगर, गांधीनगर, सुभाषनगर, पारशेवाडी, कोलशेत, जय भवानी नगर, अंबिकानगर, वाघोबानगर, जयभीमनगर, कौसा, भोलेनाथ नगर, रुपादेवी पाडा, सावरकरनगर आणि इंदिरानगर या भागांतील शौचालयांचा या महत्त्वाकांक्षी प्रकल्पात समावेश करण्यात आला आहे.

आधुनिक सुविधांनी सुसज्ज
अनेक ठिकाणी आधुनिक सुविधांनी सुसज्ज तळमजल्यावरील शौचालये उभारली जाणार आहेत. काही ठिकाणी तळ अधिक एक मजली रचना तसेच केअरटेकर रूमची सुविधाही उपलब्ध करून दिली जाणार आहे. महिलांसाठी स्वतंत्र विभाग, दिव्यांगांसाठी विशेष सुविधा, पुरेसा पाणीपुरवठा, सुधारित सांडपाणी व्यवस्था आणि स्वच्छतेवर विशेष भर देण्यात येणार आहे. तसेच दाट लोकवस्तीच्या भागांमध्ये २० सीट्स क्षमतेपर्यंतची मोठी सार्वजनिक शौचालये उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com