

भिवंडी, ता. १५ (वार्ताहर) : भिवंडी महापालिकेच्या स्थायी समिती सभापतिपदी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या इशा इमरान खान विजयी झाल्या आहेत. त्यांनी शिवसेना शिंदे गटाच्या अस्मिता नाईक यांचा चार मतांनी पराभव केला. भाजपच्या सदस्यांनी ऐनवेळी माघार घेतल्याने या निवडणुकीत सेक्युलर फ्रंटचा विजय सुकर झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत स्थायी समिती सभापतीपदासाठी इशा खान (राष्ट्रवादी), गीता नाईक (भाजप) आणि अस्मिता नाईक (शिंदे गट) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. अर्ज माघारी घेण्याच्या १५ मिनिटांच्या मुदतीत भाजपच्या गीता नाईक यांनी गटनेते संतोष शेट्टी यांच्यासमवेत सभागृहात येत उमेदवारी अर्ज मागे घेतल्याचे पत्र पिठासन अधिकाऱ्यांकडे सादर केले. त्यानंतर हात उंच करून मतदान प्रक्रिया पार पडली. या मतदानात राष्ट्रवादी (शरद पवार), काँग्रेस आणि भिवंडी विकास आघाडीचे जावेद दळवी अशा एकूण आठ सदस्यांनी इशा खान यांच्या बाजूने मतदान केले. तर शिवसेना शिंदे गट, समाजवादी पक्ष आणि कोणार्क विकास आघाडीचे ॲड. मयूरेश पाटील अशा चार सदस्यांनी अस्मिता नाईक यांना पाठिंबा दिला. भाजपच्या या भूमिकेमुळे इशा खान यांच्या विजयाचा मार्ग अधिक सोपा झाल्याचे बोलले जात आहे.
विकासकामे मार्गी लावणार
स्थायी समिती सभापतिपदी निवड झाल्यानंतर इशा खान यांनी आनंद व्यक्त करत हा विजय खासदार सुरेश म्हात्रे, आमदार रईस शेख, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे शहराध्यक्ष शोएब खान गुड्डू, महापौर नारायण चौधरी आणि माजी उपमहापौर इम्रान खान यांच्या राजकीय रणनीतीचा असल्याचे सांगितले. माझ्यासारख्या नवख्या सदस्यावर सर्वांनी विश्वास दाखवला. आता केवळ आश्वासने न देता विकासकामांना गती देण्यावर माझा भर असेल. स्थायी समितीच्या माध्यमातून शहरातील विकासकामे जलदगतीने मार्गी लावण्याचा प्रयत्न करू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आम्हाला मतदानासाठी विचारले नाही !
भाजपचे गटनेते संतोष शेट्टी यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट करताना सांगितले, स्थायी समितीत भाजपचे चार सदस्य आहेत. मात्र, आम्हाला कोणत्याही गटाकडून मतदानासाठी संपर्क साधण्यात आला नव्हता. त्यामुळे आम्ही सेक्युलर फ्रंट किंवा शिवसेना शिंदे गट या दोघांनाही मतदान न करण्याचा निर्णय घेत निवडणुकीवेळी सभागृहातून गैरहजर राहिलो.