

सडलेला खांब बदलण्याची स्थानिकांची मागणी
श्रीवर्धन, ता. १५ (वार्ताहर): श्रीवर्धन येथील आयार मोहल्ला परिसरात महावितरण कंपनीचा विद्युतवाहक खांब सडलेल्या अवस्थेत असून पावसाळा सुरू होण्याअगोदर खांब बदलण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.
आयार मोहल्ला परिसरात एका घरालगत महावितरण कंपनीने विद्युत वाहक खांब उभारला आहे. वर्षानुवर्षे घरालगतचा खांब बदलेला नाही. खांबाच्या पाया लगत बंद अवस्थेतील वीज वितरण बिंदू (डी पी) आणि अस्ताव्यस्त केबल पसरलेल्या आहेत.
या विद्युतवाहक खांबाची जीर्ण अवस्था झाली असून पायाजवळ सडलेला खांब कधीही कोसळू शकतो. त्यामुळे पावसाळ्यात विजेचा झटकाही लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
महावितरण कंपनीने श्रीवर्धन शहरात पावसाळी पूर्व कामांना सुरुवात केली असून सदरचा सडलेल्या अवस्थेतील खांब बदलावा, जेणेकरून पावसाळी दिवसांत विद्युत वाहक खांब कोसळून कोणतीही दुर्घटना घडू नये, अशी अपेक्षा स्थानिक करीत आहेत.