

अलिबाग-मुरूड एसटी शटल सेवा सुरू करावी
रहिवाशी संघाची मागणी
मुरूड ता .१५ (बातमीदार) : अलिबाग-मुरूड एसटी शटल सेवा एसटी सुरू करावी, अशी मागणी मुरूड एसटी आगार व्यवस्थापक शिंदे यांच्याकडे मुरूड -जंजिरा रहिवासी संघाकडून करण्यात आली आहे . सकाळी सव्वा सात वाजता ही बस अलिबाग येथून सुरू करण्यात यावी, असेही सांगण्यात आले आहे.
सध्या अलिबाग वरुन सकाळी ८.१५ वाजता मुरूडला एसटी सुटत असल्याने शासकीय कर्मचारी व विद्यार्थी किंवा सामान्य प्रवाशांना सकाळी ९ च्या वेळेत मुरुडला पोहचता येत नाही. त्यामुळे सर्व प्रवाशांचे हाल होत आहेत. त्याचबरोबर वृत्तपत्रे देखिल वेळेत मिळत नसल्याने वृत्तपत्र विक्रेत्यांसह वाचकांनी ही नाराजी दर्शवली आहे.
एसटी पेपर पार्सल वेळेत मिळत नसल्याने वृत्तपत्राचा खप देखिल खूप कमी झाला आहे. परिणामी वृत्तपत्र विक्रेत्यांना एजन्सी बंद करण्याशिवाय पर्याय उरला नसल्याचे चित्र आहे. तसेच सामान्य नागरिक व विद्यार्थ्यांच्या समस्यांचा विचार करुन आगार व्यवस्थापकांनी अलिबागवरुन मुरूड एसटी सकाळी ७ .१५ वा. ची शटल सेवा सुरू करण्याची विनंती मुरूड-जंजिरा रहिवासी संघाकडून करण्यात आली आहे.