

नाल्यात उतरून मनसेचे फुटबॉल आंदोलन
ठाण्यात नालेसफाईचा बोजवारा
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १५ : शहरातील नालेसफाईची अवस्था अत्यंत दयनीय असल्याचे समोर आले आहे. ठाणे महापालिका प्रशासनाने नालेसफाईचे १०० टक्के दावे केले असले तरी, प्रत्यक्षात मात्र गांधीनगर, सुभाषनगर, वर्तकनगर, लोकमान्यनगर आणि इंदिरानगर यांसारख्या भागांतील नाले कचऱ्याने तुडुंब भरले आहेत. या ढिसाळ कारभाराचा निषेध करण्यासाठी शुक्रवारी (ता. १५) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जनहित व विधी विभागाचे ठाणे शहर अध्यक्ष स्वप्नील महिंद्रकर आणि कार्यकर्ते थेट नाल्यात उतरून फुटबॉल खेळून आंदोलन करण्यात आले.
नालेसफाईचे काम केवळ कागदावरच चमकत आहे. आयुक्तांनी एसी गाडीतून बाहेर पडून प्रभाग समितीनिहाय नाल्यांची स्वतः पाहणी करणे गरजेचे आहे. जे ठेकेदार कामात कसूर करत आहेत, त्यांच्यावर तत्काळ कठोर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी स्वप्नील महिंद्रकर यांनी केली आहे.
दरवर्षी ठाणे महापालिकेकडून प्रभाग समितीनिहाय नालेसफाईची आकडेवारी जाहीर केली जाते. मात्र, यंदा अद्याप अशी कोणतीही स्पष्ट माहिती समोर आलेली नसल्याने नागरिकांमध्ये संशयाचे वातावरण आहे. नालेसफाईची कामे ठेकेदारांना देण्यात येतात. मात्र, संबंधित प्रभाग समित्यांतील अधिकारी आणि ठेकेदार यांच्या संगनमतामुळे फक्त देखाव्यापुरती साफसफाई केली जात असल्याचा आरोप मनसेच्या वतीने करण्यात येत आहे. प्रत्यक्षात नाले तुंबलेल्या अवस्थेत असतानाही कोट्यवधी रुपयांची देयके मंजूर केली जात असल्याची चर्चा रंगली आहे. दरम्यान, पाऊस उंबरठ्यावर असतानाही नाले उपसले न गेल्याने ठाणेकरांमध्ये भीतीचे वातावरण आहे. जर वेळेत नालेसफाई झाली नाही, तर पावसाळ्यात सखल भागात पाणी शिरून जनजीवन विस्कळित होण्याची चिन्हे आहेत. या संपूर्ण प्रकाराविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी नाल्यात फुटबॉल खेळून आंदोलन केले. कार्यकर्त्यांनी थेट नाल्यात उतरून प्रशासनाच्या निष्क्रियतेचा निषेध व्यक्त केला. तसेच ठाणे महापालिका आयुक्तांना जाब विचारत तातडीने प्रभावी नालेसफाई करण्याची मागणी करण्यात आली.
ड्रोनची नजर फक्त कागदावरच?
ठाणे महापालिका आयुक्तांनी यंदा नालेसफाईवर ड्रोनच्या माध्यमातून नजर ठेवण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. मात्र, प्रत्यक्ष पाहणीत नाले कचऱ्याने भरलेले असून, ड्रोनचा मागमूसही लागत नाहीये. आयुक्तांची ड्रोनची कबुली फक्त कागदावरच उरली असून, प्रत्यक्षात नाले सफाईच्या नावाखाली केवळ धूळफेक सुरू आहे, अशी टीका मनसेच्या स्वप्नील महिंद्रकर यांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.