

मुंबई एपीएमसी आता ‘डिजिटल’
बाजार समितीत फास्टॅग, बूम बॅरियर प्रणालीने होणार वाहतूक नियंत्रण
जुईनगर, ता. १४ (बातमीदार) : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात आता डिजिटल वाहतूक व्यवस्थापनाची अंमलबजावणी होणार आहे. वाढती वाहन गर्दी, अनियंत्रित प्रवेश, बेकायदा पार्किंग आणि महसूल गळती रोखण्यासाठी एपीएमसी प्रशासनाने फास्टॅग आधारित अत्याधुनिक वाहतूक नियंत्रण प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. पणन संचालक तथा मुंबई बाजार समिती सचिव शरद जरे यांच्या पुढाकारातून ही प्रणाली लवकरच कार्यान्वित होणार असून, बाजार आवारातील वाहतूक व्यवस्थापन अधिक पारदर्शक आणि शिस्तबद्ध करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे.
प्रतिदिन हजारो ट्रक, टेम्पो आणि पिकअप वाहनांद्वारे बाजारात शेतमालाची आवक-जावक होत असते. मात्र, माल उतरवल्यानंतरदेखील अनेक वाहने बाजार परिसरात उभी राहत असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होते. या पार्श्वभूमीवर टोलनाका आणि शॉपिंग मॉलच्या धर्तीवर फास्टॅग स्कॅनिंग व बूम बॅरियर प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रणालीमुळे प्रत्येक बाजार आवारात दररोज येणाऱ्या वाहनांची संख्या, प्रवेश शुल्क, आकारण्यात आलेला दंड आणि महसूल यांची अचूक माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. परिणामी, मॅन्युअल नोंदणी कमी होऊन मानवी हस्तक्षेप आणि संभाव्य गैरव्यवहारांवरही आळा बसणार आहे. महसूल वसुलीतील गळती रोखणे, वाहतूक सुरळीत करणे आणि संपूर्ण बाजार व्यवस्थापन अधिक पारदर्शक बनवणे या उद्देशाने एपीएमसी प्रशासनाने उचललेले हे पाऊल भविष्यात इतर बाजार समित्यांसाठीही आदर्श ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
कशी असेल नवी प्रणाली?
बाजारात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक वाहनाची डिजिटल नोंद केली जाणार आहे. स्वयंचलित सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे वाहन क्रमांक स्कॅन करून प्रवेशाची वेळ संगणकीय प्रणालीमध्ये जतन केली जाईल. निश्चित कालावधीपेक्षा अधिक वेळ वाहन बाजार परिसरात थांबल्यास संबंधित वाहनधारकांकडून फास्टॅगद्वारे स्वयंचलित दंड आकारला जाणार आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीवर मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळवणे शक्य होणार असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.