डोंगरांवर रसायनांचे ढिगारे

डोंगरांवर रसायनांचे ढिगारे
Published on

डोंगरांवर रसायनांचे ढिगारे
पिंपरी-ठाकूरपाडा ग्रामस्थ प्रदूषणाने त्रस्त
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १५ ः नवी मुंबई महापालिका हद्दीलगतच्या १४ गावांमध्ये रासायनिक प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनला असून, ठाणे तालुक्यातील पिंपरी आणि ठाकूरपाडा परिसरातील डोंगराळ भागात मोठ्या प्रमाणावर केमिकल वेस्ट टाकण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. डोंगर परिसरात लाखो रासायनिक कचऱ्याच्या गोण्या फेकून देण्यात आल्याने संपूर्ण परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली असून, ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
औद्योगिक क्षेत्रातील धोकादायक रासायनिक कचरा ग्रामीण व वनक्षेत्र परिसरात आणून टाकला जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. अनेक ठिकाणी रसायनांनी भरलेल्या गोण्यांचे ढिगारे उघड्यावर पडलेले दिसत असून, काही भागांत जमिनीतून धूर निघत असल्याचेही ग्रामस्थांनी सांगितले. त्यामुळे हवा, माती आणि भूजल दूषित होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
या विषारी कचऱ्याचा परिणाम स्थानिक जैवविविधतेवरही होत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे. परिसरातील आदिवासी नागरिकांच्या मते, पूर्वी मोठ्या प्रमाणावर दिसणारे पक्षी, ससे, साप आणि इतर वन्यजीव आता पूर्णपणे गायब झाले आहेत. रासायनिक प्रदूषणामुळे डोंगर परिसरातील वनसंपदा उद्ध्वस्त होत असून, भविष्यात या भागात नैसर्गिक पुनरुत्पादन होणे कठीण होईल, अशी भीती पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, या गंभीर प्रकाराकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

वैज्ञानिक तपासणी करावी
१४ गावांच्या डोंगररांगांमध्ये सुरू असलेला हा रासायनिक कचऱ्याचा प्रकार नेमका कोणाच्या संरक्षणाखाली सुरू आहे, असा सवाल उपस्थित होत आहे. प्रशासनाने तातडीने चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, तसेच परिसरातील प्रदूषणाची वैज्ञानिक तपासणी करून ग्रामस्थांना दिलासा द्यावा, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com