मेहनत, कौशल्य आणि जिद्दीच्या जोरावर तृतीयपंथीयांची भरारी

मेहनत, कौशल्य आणि जिद्दीच्या जोरावर तृतीयपंथीयांची भरारी
Published on

मेहनत, कौशल्य आणि जिद्दीच्या जोरावर तृतीयपंथींची भरारी
‘महालक्ष्मी सरस’मधील लक्षवेधी स्टॉल

नीलेश मोरे ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १५ ः स्वतंत्र नोकरी किंवा व्यवसायासाठी आर्थिक पाठबळ नसल्याने काही तृतीयपंथींना भीक मागून उदरनिर्वाह करावा लागतो; मात्र या चौकटी मोडत काही तृतीयपंथींनी स्वतःचा उद्योग उभा करत समाजाचा दृष्टिकोन बदलण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्याचाच प्रत्यय सध्या मुंबईतील महालक्ष्मी सरस २०२६ प्रदर्शनात पाहायला मिळत आहे.
मुंबईतील एमएमआरडीए मैदानावर महालक्ष्मी सरस प्रदर्शन सुरू आहे. राज्यासह देशभरातील उद्योजक, स्वयंरोजगार गटांचे तसेच स्थानिक उत्पादनांचे स्टॉल उभारण्यात आले आहेत. विविध राज्यांच्या संस्कृती आणि कौशल्यांचा संगम अनुभवायला मिळत असताना तृतीयपंथींच्या स्टॉलने विशेष लक्ष वेधून घेतले आहे.
या प्रदर्शनात तृतीयपंथी व्यक्तींच्या बचत गटांना आत्मनिर्भरतेची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. ठाण्यातील कळवा येथून आलेल्या तृतीयपंथी उद्योजिका जया जाधव यांचा पापड, लोणचे आणि मसाल्यांचा होलसेल स्टॉल तर केरळमधील कोची येथून आलेल्या अमृता जोसेफ मॅथ्यू यांचा फ्रूट ज्यूस स्टॉल नागरिकांच्या पसंतीस उतरला आहे. ग्राहकांकडून मिळणारा सकारात्मक प्रतिसाद त्यांच्या आत्मविश्वासात भर घालत आहे.

अपयश आले... पण हार मानली नाही
ठाण्यातील कळवा येथील मनीषानगर येथे राहणाऱ्या जया जाधव यांनी लॉकडाऊननंतर छोट्या व्यवसायातून आत्मनिर्भरतेचा प्रवास सुरू केला. सुरुवातीला लोक आपल्याकडून वस्तू विकत घेतील का, अशी भीती मनात होती. विविध व्यवसाय सुरू केले; मात्र अपेक्षित यश मिळाले नाही; मात्र हार मानली नाही. आईकडून शिकलेले पापड बनविण्याचे कौशल्य उपयोगाला आले, त्यात यश मिळत गेले. आज १६ तृतीयपंथींच्या सहकार्याने व्यवसाय वाढविला आहे. समाजात स्वतःची ओळख निर्माण केल्याचेही त्यांनी सांगितले.
तृतीयपंथी समाज मेहनत आणि कौशल्याच्या जोरावर पुढे येत असेल तर त्यांना सहकार्य केले पाहिजे, अशी प्रतिक्रिया ग्राहक भारती पवार यांनी दिली. शेवटी तेही माणूसच आहेत. त्यांनाही उद्योगासाठी संधी मिळाली तर ते आपले कौशल्य दाखवू शकतात, अशी प्रतिक्रिया उमा राणे यांनी दिली.

कक्कनाड निलीला प्रतिसाद
केरळमधील कोची येथून आलेल्या तृतीयपंथी उद्योजिका अमृता जोसेफ मॅथ्यू यांच्या फ्रूट ज्यूस स्टॉललाही नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. कमी शिक्षण असूनही अमृतांनी हार मानली नाही. त्यांनी कोची येथे फ्रूट ज्यूस सेंटर सुरू केले. तसेच घरगुती लोणचेही प्रदर्शनात आहे. त्यांच्या स्टॉलवरील कक्कनाड निली हा मिक्स ज्यूस ग्राहकांमध्ये विशेष लोकप्रिय ठरत असल्याचे अमृता यांनी सांगितले.

महालक्ष्मी सरस प्रदर्शनात मिळणाऱ्या प्रतिसादामुळे आत्मविश्वास वाढला आहे. समाजात स्वतःची ओळख निर्माण करण्याची नवी संधी मिळत आहे.
- जया जाधव, तृतीयपंथी उद्योजिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com