गुगलद्वारे फसवणुकीचे भूत कायम

गुगलद्वारे फसवणुकीचे भूत कायम
Published on

गुगलद्वारे फसवणुकीचे भूत कायम
एडिट अँड सजेस्ट सुविधेचा गैरवापर सुरूच

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १५ ः गुगलद्वारे बँक, डॉक्टर, विविध सेवा-सुविधा पुरवणाऱ्या शासकीय, खासगी आस्थापनांचा, त्यांच्या ग्राहक सेवा केंद्रांचा संपर्क क्रमांक शोधणे आजही धोक्याचे ठरते आहे. दहा वर्षांपूर्वी सायबर भामट्यांनी गुगलआधारे सुरू केलेले आर्थिक फसवणुकीचे सत्र आजही सुरूच आहे.
यानिमित्ताने होणाऱ्या फसवणुकीच्या घटनांमध्ये वृद्ध सर्वाधिक लक्ष्य केले जात आहेत. डॉक्टरची भेट (अपॉइंटमेंट), घरबसल्या बँक खात्याशी संबंधित शंकांचे निरसन करून घेण्यासाठी शाखेचा फोन नंबर शोधणारे वृद्ध सर्वाधिक लक्ष्य केले जात आहेत. गेल्या काही महिन्यांमध्ये सर्वाधिक फसवणुकीच्या घटना नेमक्या डॉक्टरचा संपर्क क्रमांक शोधणाऱ्यांसोबत विशेषतः ज्येष्ठ नागरिकांसोबत घडत आहेत.


अशी होते फसवणूक
- गुगलने अनेक वर्षांपूर्वी वापरकर्त्यांना अचूक माहिती उपलब्ध व्हावी म्हणून एडिट अँड सजेस्ट हा पर्याय उपलब्ध करून दिला. त्याद्वारे एखादे स्थळ, आस्थापना, सेवा आदी प्रत्येक माहितीत बदल करण्याचे अधिकार गुगलने वापरकर्त्यांना देऊ केले. या सुविधेचा निश्चितच वापरकर्त्यांना फायदा झाला; मात्र सायबर भामट्यांनी याच सुविधेचा गैरवापर करून फसवणूक करण्याची नवी शक्कल काढली.
- भामट्यांनी सुरुवातील बँक आणि मोबाईल, इंटरनेट सेवा पुरवणाऱ्या, ऑनलाइन खरेदीची सुविधा आणि वस्तू घरपोच देणाऱ्या कंपन्या आणि ॲपना लक्ष्य केले. या आस्थापनांची गुगलवरील माहिती भामट्यांनी एडिट केली. म्हणजे आस्थापनांचे संपर्क क्रमांक खोडून त्याऐवजी स्वतःचे मोबाईल क्रमांक दिले.
- एखाद्या व्यक्तीने बँक, मोबाईल कंपनी समजून संपर्क साधल्यास भामटे त्यांना संबंधित कंपनीचे अधिकारी, कर्मचारी असल्याचे भासवत बोलण्यात गुंतवून बँकिंग डेबिट, क्रेडिट कार्ड क्रमांक, सीवीवी, ओटीपी आदी तपशील घेऊन परस्पर त्यांच्या बँक खात्यावरील रक्कम स्वतःकडे घेत.
- पुढे बहुतांश सर्वच शासकीय, खासगी आस्थापनांची गुगलवरील माहिती एडिट करून भामट्यांनी देशभर फसवणुकीचे सत्र आरंभले.

अलीकडे घडलेल्‍या घटना
- मलबार हिल येथील जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या शासकीय निवासस्थानी कर्तव्यावर असलेले पोलिस शिपाई या गुन्हे प्रकाराचे ताजे लक्ष्य ठरले. ४ मे रोजी मंत्र्यांच्या स्वीय सहाय्यकाने रामदास जरग या पोलिस शिपायास केईएम रुग्णालयातील एका डॉक्टरची अपॉइंटमेंट घेण्यास सांगितले. जरग यांनी गुगलवरून रुग्णालयाचा संपर्क क्रमांक शोधला. संपर्क साधताच समोरील व्यक्तीने रुग्णालयाचा ऑपरेटर बोलत असून अपॉइंटमेंटसाठीचा फॉर्म आणि माहिती व्हॉट्सॲपवर पाठवतो, असे सांगितले. हा फॉर्म भरून देताच जरग यांच्या खात्यातून १.१७ लाख रुपये परस्पर वळते झाले. तो फॉर्म एपीके फाईल होती आणि तो संपर्क क्रमांक रुग्णालयाचा नव्हता, असे तपासात स्पष्ट झाले.
- विलेपार्ले परिसरात राहणाऱ्या महिलेस चुनाभट्टी येथील खासगी रुग्णालयात प्रॅक्टिस करणाऱ्या महिला डॉक्टरची वेळ हवी होती. डॉक्टरांचा वैयक्तिक क्रमांक नसल्याने या महिलेने गुगलचा आधार घेतला. या महिलेलाही एपीके फाईलद्वारे दोन लाखांना फसविण्यात आले.
- ताडदेवच्या वृद्ध व्यावसायिकाला रिलायन्स रुग्णालयातील एका डॉक्टरकडून उपचार हवे होते. गुगलद्वारे रुग्णालयाचा क्रमांक मिळवून संपर्क साधला असता वृद्धाच्या बँक खात्यातून परस्पर एक लाख रुपये वळते झाले.
- माझगाव येथील वयोवृद्धास दम्याच्या आजारावर वरळीच्या पोद्दार रुग्णालयाच्या डॉक्टरची वेळ हवी होती. त्यांनी गुगलचा आधार घेतला आणि त्यांच्या खात्यातून ७५ हजार वळते झाले.


लिंक क्लिक करू नका!
गुगलवरील संपर्क क्रमांक खरेच त्या आस्थापनेचे असतील यावर विश्वास ठेवू नका. या क्रमांकावर संपर्क साधल्यास समोरून पाठवण्यात आलेल्या अनोळखी लिंक, ॲप डाऊनलोड करू नका, त्यावर क्लिक करू नका. आपले बँकिंग तपशील समोरच्याला देऊ नका, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com