बांबू हस्तकलेतून महिलांना रोजगार

बांबू हस्तकलेतून महिलांना रोजगार
Published on

कासा, ता. १५ (बातमीदार) : पालघर जिल्ह्यातील घोलवड, बोर्डी, जव्हार आणि विक्रमगड येथे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (एमटीडीसी) वतीने मंगळवार (ता. १२) ते मंगळवार (ता. २६) दरम्यान बांबू हस्तकला व स्मृतिचिन्ह विकास कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमात सुमारे २०० हून अधिक आदिवासी महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला असून, स्थानिक कला, पर्यटन आणि रोजगार यांना चालना देण्याचा महत्त्वपूर्ण प्रयत्न या माध्यमातून होत आहे.

पावसाळ्याच्या काळात आणि दिवाळीच्या सणासुदीत या भागात मोठ्या प्रमाणावर पर्यटक येत असतात. विशेषतः आकाशकंदील, बांबूपासून तयार होणारी सजावटीची उत्पादने आणि हस्तकलेच्या वस्तूंना मोठी मागणी असते. ही बाब लक्षात घेऊन स्थानिक आदिवासी परंपरा आणि पर्यटन यांची सांगड घालण्यासाठी ‘एमटीडीसी’ने ही कार्यशाळा आयोजित केली आहे.

या कार्यशाळेसाठी देशभरातील अनुभवी डिझायनर आणि बांबू हस्तकला तज्ज्ञ सहभागी झाले आहेत. विविध राज्यांमध्ये कामाचा अनुभव असलेले ज्येष्ठ डिझायनर गौतम मोदक हे कार्यशाळेचे मार्गदर्शन करत असून, युवा डिझायनर बनी प्रसाद आणि मिनार्भा घोष हे उत्पादन डिझाइनची जबाबदारी सांभाळत आहेत. तसेच नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातून आलेले बांबू मास्टर क्राफ्ट्समन रामदास फुपाणे, राजेंद्र ठाकरे, तुळशीराम ठाकरे, पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील शंकर खरपडे तसेच पश्चिम बंगालमधील मालदा जिल्ह्यातून आलेले श्रीनाथ टुडू आणि संजित टुडू हे सहा अनुभवी कलाकार प्रशिक्षण देत आहेत. कार्यशाळेचे समन्वयन दिशारी मुखर्जी, नंदोलाल महातो, सुनयना दासगुप्ता, नीलिमा सुरती आणि दिलीप घाटाल हे करत आहेत.

या उपक्रमामुळे पर्यटकांना गावांमध्ये आकर्षित करण्यास मदत होणार असून, पर्यटक आता केवळ पर्यटनासाठी न येता स्थानिक कलाकारांकडून हस्तकला शिकू शकतील तसेच त्यांच्या तयार वस्तूंची खरेदीही करू शकतील. त्यामुळे आदिवासी कलाकारांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत.

शेतकऱ्यांना आर्थिक लाभ
‘एमटीडीसी’च्या या उपक्रमातून ग्रामीण आणि आदिवासी भागांना अनुभवी पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. शासनाने राबविलेल्या बांबू लागवड धोरणामुळे पालघर जिल्ह्यात अनेक ठिकाणी बांबू लागवड करण्यात आली आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांनाही आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता असून, पर्यावरण संवर्धनालाही चालना मिळणार आहे.

नव्या कलाकारांची निर्मिती
या कार्यशाळेमुळे स्थानिक युवक-युवती आणि महिलांमध्ये कला कौशल्य विकसित होऊन नव्या कलाकारांची निर्मिती होईल. त्याचबरोबर रोजगार, स्वावलंबन आणि उदरनिर्वाहाचे साधन उपलब्ध होऊन आदिवासी समाजाच्या आर्थिक उन्नतीस मदत होणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.

कासा : बांबू हस्तकला कार्यशाळेत महिला विविध प्रकारच्या वस्तू बनवत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com