बंद एसटीपी प्रकल्पांचे होणार ऑडिट

बंद एसटीपी प्रकल्पांचे होणार ऑडिट
Published on

बंद एसटीपी प्रकल्पांचे होणार ऑडिट
महासभेत उपाययोजनांवर चर्चा; अवकाळी संकटासाठी ठाणे महापालिका सज्ज

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १५ ः हवामान बदलामुळे निर्माण होणाऱ्या संभाव्य पाणीटंचाई आणि अवकाळी पावसाच्या दुहेरी संकटाचा सामना करण्यासाठी ठाणे पालिकेने व्यापक स्तरावर उपाययोजना सुरू केल्या. शहरातील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी), रेन वॉटर हार्वेस्टिंग व्यवस्था, विहिरींचे पुनरुज्जीवन आणि पुनर्प्रक्रिया केलेल्या पाण्याच्या वापरावर विशेष भर देत नियोजनबद्ध पद्धतीने काम सुरू असल्याची माहिती महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी शुक्रवारी (ता. १५) झालेल्‍या महासभेत दिली.
पालिकेच्या एसटीपी प्रकल्पातून प्रक्रिया केलेले १२ दशलक्ष लिटर पाणी बोरिवली बोगदा प्रकल्पासाठी प्रतिहजार लिटर ७.५० रुपये दराने पुरवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
महासभेच्या सुरुवातीलाच हवामान बदल आणि त्याचा शहरावर होणारा परिणाम या विषयावर शिवसेनेचे (शिंदे) नगरसेवक राजेश मोरे यांनी लक्षवेधी मांडली. या वेळी शहरातील एसटीपी प्रकल्पांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत प्रशासनाला धारेवर धरले. पाणीगळतीचे वाढते प्रमाण, रेनवॉटर हार्वेस्टिंग योजनांची अपुरी अंमलबजावणी आणि विकसकांकडून उभारण्यात आलेले पण प्रत्यक्षात बंद अवस्थेत असलेले एसटीपी प्रकल्प याकडे त्यांनी लक्ष वेधले.
अनेक विकसक केवळ प्रकल्पाला मंजुरी मिळवण्यासाठी एसटीपी उभारतात; मात्र पुढे त्यांची देखभाल होत नाही. हे प्रकल्प प्रत्यक्ष सुरू आहेत का, त्यांचा उपयोग किती होतो, याची तपासणी आवश्यक असल्याचे मोरे यांनी सभागृहात सांगितले. त्याच वेळी शहरातील कूपनलिकांची स्थिती, पुनर्प्रक्रिया पाण्याचा वापर आणि जलनियोजनाबाबतही गंभीर चर्चा होणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या चर्चेला उत्तर देताना आयुक्त सौरभ राव यांनी प्रशासनाची भूमिका स्पष्ट केली. राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच बैठक पार पडली असून त्यामध्ये पाणीटंचाई आणि अवकाळी पावसाच्या संकटावर उपाययोजनांबाबत सविस्तर मार्गदर्शन मिळाल्याचे त्यांनी सांगितले. त्यानुसार ठाणे महापालिकेने अल्पकालीन आणि दीर्घकालीन नियोजन सुरू केले आहे. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध भागांत नागरिकांसाठी शेड उभारण्यात आले असून ५० पाणपोई सुरू करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. त्याचबरोबर शहरातील सर्व एसटीपी प्रकल्पांची तपासणी करण्यात येणार असून विकसकांनी उभारलेले प्रकल्प प्रत्यक्ष कार्यरत आहेत का, त्यांची क्षमता किती आहे आणि प्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापर कशासाठी केला जातो, याचे ऑडिट करण्यात येणार आहे.
बंद अवस्थेतील एसटीपी प्रकल्प तातडीने सुरू करण्याचे निर्देश देण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. प्रक्रिया केलेले पाणी उद्याने, बांधकामे, औद्योगिक वापर आणि इतर बिगरपेयजल कामांसाठी वापरण्यावर महापालिका भर देणार आहे.

विहिरींचे पुनरुज्जीवन
शहरात सध्या २,५११ ठिकाणी रेन वॉटर हार्वेस्टिंग व्यवस्था उभारण्यात आली आहे; मात्र त्या प्रत्यक्ष कार्यरत आहेत का, याची स्वतंत्र तपासणी केली जाणार आहे. पावसाचे पाणी साठवून भूजल पातळी वाढविण्याच्या दृष्टीने या यंत्रणांची प्रभावी अंमलबजावणी होणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. विहिरींच्या पुनरुज्जीवनाचे कामही महापालिकेने हाती घेतले असून ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत मिळालेला निधी त्यासाठी वापरण्यात येत आहे. शहरातील ६५ ठिकाणांपैकी ३५ ठिकाणी आरओ प्रकल्प सुरू असून तेथील पाणी पिण्यासाठी वापरले जात असल्याची माहितीही त्यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com