

वीजवाहक तार दुचाकीवरील आई-लेकरावर कोसळली
अंबरनाथमध्ये एमएसईबीची हलगर्जी; सुदैवाने मोठी जीवितहानी टळली
अंबरनाथ, ता. १५ (वार्ताहर) ः अंबरनाथमध्ये महावितरणच्या मॉन्सूनपूर्व दुरुस्ती कामांदरम्यान शुक्रवारी (ता. १५) सकाळी वीजवाहक तार थेट दुचाकीवरून जाणाऱ्या आई-लेकरावर कोसळल्याची घटना घडली. दोघांवर रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे.
कल्याण-बदलापूर महामार्गावरील एमएसईबीच्या कार्यालयासमोर ही घटना घडली. या दुर्घटनेत स्नेहलता नावाची महिला आणि त्यांचा मुलगा जखमी झाले असून, सुदैवाने मोठी जीवितहानी टळली. संबंधित तरुण शुक्रवारी सकाळी आपल्या आईला कामावर सोडण्यासाठी दुचाकीवरून जात होता. त्याच वेळी एमएसईबीकडून मॉन्सूनपूर्व दुरुस्तीची कामे सुरू होती. अचानक हायटेंशन वीजतार त्यांच्या अंगावर कोसळली. प्रसंगावधान राखत तरुणाने दुचाकी थांबवली, मात्र, तार त्याच्या डोक्यावरून खांद्यावर आदळली. दुचाकीच्या मागे बसलेल्या आईच्या गळ्याभोवती तार अडकल्याने त्यांच्या गळ्याला गंभीर दुखापत झाली.
घटनेनंतर जखमी महिलेकडून अधिकाऱ्यांकडे विचारणा करण्यात आली असता, देखभाल आणि दुरुस्तीची कामे सुरू असताना हा प्रकार घडला, असे उत्तर देण्यात आल्याचे सांगण्यात आले. मात्र, कोणतीही पूर्वसूचना न देता तसेच सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना न करता काम सुरू असल्याचा आरोप जखमी महिलेने केला आहे. या घटनेत मोठी दुर्घटना घडली असती तर त्याला जबाबदार कोण? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ धाव घेत जखमींना मदत केली. त्यानंतर दोघांना उपचारासाठी अंबरनाथ येथील शासकीय छाया रुग्णालयात दाखल करण्यात आले.
सुरक्षेच्या उपायांकडे दुर्लक्ष
या प्रकारानंतर स्थानिक नागरिकांनी एमएसईबीच्या कामकाजावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. दुरुस्तीची कामे सुरू असताना कोणतेही बॅरिकेड्स, सुरक्षा उपाययोजना किंवा वाहतूक नियंत्रण नसल्याचा आरोप नागरिकांनी केला. मान्सूनपूर्व कामांच्या नावाखाली नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे, अशी तीव्र प्रतिक्रिया परिसरातील नागरिकांकडून व्यक्त करण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.