

विठ्ठलवाडीत जुन्या वादाचे हिंसक रूप
महिलेचे केस कापत मारहाण; भररस्त्यात रक्तरंजित राडा
उल्हासनगर, ता. १५ (वार्ताहर) : उल्हासनगरातील विठ्ठलवाडी रेल्वे स्थानक परिसरात जुन्या वादातून तिघांवर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (ता. १४) घडली. काही जणांनी भररस्त्यात महिलांसह एका तरुणाला मारहाण करत फरपटत नेल्याचा आरोप असून, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करत दोन महिलांना शुक्रवारी (ता. १५) अटक केली आहे.
विठ्ठलवाडी रेल्वे स्थानक परिसरात जुन्या वादातून झालेल्या हाणामारीत तिघे जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. याप्रकरणी जुली वाघरी, मटकी वाघरी, विणू वाघरी आणि त्यांच्या सोबतच्या एका मुलाविरोधात मध्यवर्ती पोलिस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कांता राजपूत (वय ५०) या व्यवसाय करत असून, त्या विठ्ठलवाडी पोलिस ठाण्याजवळील गोपाळ समाज मित्र मंडळ परिसरात राहतात.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कांता यांच्या बहिणीच्या सुनेसोबत पूर्वी झालेल्या भांडणाच्या रागात कांता राजपूत, राज राजपूत आणि सुनील राजपूत यांना आरोपींनी शिवीगाळ करत मारहाण केली. यातील सुनील राजपूत हा रिलायन्स कंपाउंडमध्ये कामावर असताना आरोपींनी त्याला बाहेर फरपटत रस्त्यावर आणून बेदम मारहाण केल्याचा आरोप राजपूत कुटुंबीयांनी केला आहे. या हल्ल्यात सुनील गंभीर जखमी झाला असून, कांता यांच्या डोक्याचे केस कापून त्यांनाही दुखापत करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. घटनेनंतर जखमी तिघांनाही उपचारासाठी उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी या प्रकरणी दोन महिलांना अटक केली असून, इतर आरोपी फरार आहेत. पुढील तपास मध्यवर्ती पोलिस ठाण्याचे अधिकारी करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.