

खारघरच्या प्रवेशद्वाराने टाकली कात
उत्सव चौक ते हिरानंदानी मार्गावर आकर्षक पदपथ, सायकल ट्रॅकची निर्मिती
खारघर, ता. २२ (बातमीदार) : खारघरमधील उत्सव चौक ते हिरानंदानी परिसराकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूंना नागरिकांसाठी आधुनिक आणि आकर्षक पदपथ विकसित करण्यात आले आहेत. पनवेल पालिका व संबंधित यंत्रणांच्या माध्यमातून राबविलेल्या या उपक्रमामुळे खारघरच्या सौंदर्यात मोठी भर पडली असून, स्थानिक नागरिकांकडून या प्रकल्पाचे स्वागत केले जात आहे.
खारघरच्या प्रवेशद्वार असलेल्या हिरानंदानी पुलाकडून उत्सव चौक दरम्यान सिडकोने सहा पदरी रस्ते उभारून दोन्ही बाजूने रोप लागवड केली आहे. तसेच, नागरिकांना विरंगुळ्यासाठी पदपथालगत आकर्षक कट्टे तयार केले होते. मात्र, हे कट्टे धोकादायक असल्यामुळे पालिकेने रस्त्याच्या दोन्ही बाजूने आकर्षक गोलाकार कट्टे उभारले आहेत. तसेच, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांसाठी विशेष झोपाळ्यांची सुविधाही दिली आहे. पदपथावर दिव्यांगांसाठी स्पर्शदर्शक टाईल्सची बसविण्यात आले आहेत. त्यामुळे हा परिसर केवळ पदपथ न राहता एक सामाजिक संवाद आणि विरंगुळ्याचे केंद्र बनत आहे.
पर्यावरणपूरक उपक्रम
रस्त्याच्या दोन्ही बाजूंना स्वतंत्र सायकल ट्रॅक असून, पर्यावरणपूरक वाहतुकीला चालना देण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वाचा मानला जात आहे. याशिवाय पदपथालगत हिरवळ, सुशोभीकरणासाठी कमानीच्या आकाराची रचना आणि मोठ्या वृक्षांचे संवर्धन करण्यात आले आहे. त्यामुळे या मार्गावर चालणे, व्यायाम करणे आणि सायकलिंग करणे अधिक आनंददायी झाले आहे.
हिरानंदानीकडून उत्सव चौककडे जाणाऱ्या रस्स्त्याकडेला सकाळ-संध्याकाळ ज्येष्ठ विरंगुळ्यासाठी येत असतात. ज्येष्ठ आणि लहान मुलांसाठी विशेष झोपाळ्यांची तसेच निवांत बसता यावे यासाठी गोल आकाराच्या कट्टे उभारण्यात आले आहे. हे सर्व काम आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली सुरु असून सुशोभीकरणाचे काम लवकरच पूर्ण केले जाणार आहे.
- संजय कटेकर, मुख्य अभियंता, पनवेल पालिका
अनधिकृत खाऊगल्ल्यांवर कारवाई करा
उत्सव चौक, बँक ऑफ इंडिया मार्गे हिरानंदानी पुलाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला पालिकेने सुंदर सुशोभीकरण केले आहे. मात्र, सायंकाळी सातनंतर पदपथालगत अनधिकृत खाद्यपदार्थ गाड्या उभ्या केल्या जातात. त्यामुळे परिसरात अस्वच्छता पसरलेली असते. पालिकेने अनधिकृत गाड्यांवर कारवाई करून हा परिसर स्वच्छ ठेवावे, अशी मागणी रहिवाशांकडून केली जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.