नेतृत्वाचे आत्मपरीक्षण अन् पक्षातील फूट

नेतृत्वाचे आत्मपरीक्षण अन् पक्षातील फूट
Published on

नेतृत्वाचे आत्मपरीक्षण अन् पक्षातील फूट
​भारतीय राजकीय पटलावर पक्षांतर्गत संघर्ष आणि मोठी फूट ही केवळ ‘बंडखोरी’ नसते. जेव्हा बहुतांश लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते पक्ष सोडतात, तेव्हा मूळ नेतृत्वाने आत्मपरीक्षण करणे गरजेचे असते. कोणत्याही पक्षाचा कणा हा अंतर्गत लोकशाही असतो. निर्णयप्रक्रिया मोजक्या हातांत किंवा कौटुंबिक प्रभावाखाली केंद्रित झाल्यास सुप्त असंतोष वाढतो. वारशासोबत गुणवत्ता आणि सर्वसमावेशकता नसेल, तर कार्यकर्त्यांमध्ये उपेक्षेची भावना निर्माण होते. ​नेतृत्व आणि कार्यकर्ता यांच्यातील थेट संवाद हा पक्षाचा प्राणवायू आहे. ६० ते ७० टक्के सहकारी दूर गेल्यास केवळ त्यांच्या स्वार्थावर बोट न ठेवता, आपल्यातील ‘अहंभाव’ आणि उणिवांचे प्रामाणिक विश्लेषण नेतृत्वाने केले पाहिजे. लोकशाहीत पक्ष कोणाच्या मालकीचा नसतो, तो विचारांचा आणि कार्यकर्त्यांच्या घामाचा संच असतो. निरंतर संवाद, परस्पर विश्वास आणि वेळेवर केलेले आत्मपरीक्षण हेच पक्षाचे खरे सामर्थ्य आहे. फुटीतून धडा घेऊन बदलणारे नेतृत्वच पक्षाला पुनरुज्जीवन देऊ शकते.
- वीरेंद्र सोनावणे, मुंबई
----
परिवहन सेवा बळकट करा!
बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपामुळे मुंबईतील वाहतूक सेवा ठप्प झाली आहे. लाखो प्रवाशांचे हाल होत आहेत. मध्यंतरी बेस्टचे किमान भाडे पाच रुपये होते, ते नंतर दहा रुपये झाले, तरीही मुंबईकर बेस्टने प्रवास करीत आहेत. मुंबईत गल्लोगल्लीत जाणारी बेस्ट आणि गावोगावी जाणारी लालपरी या परिवहन जनसेवेकडे राज्य सरकारचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. फुकट रेवड्या वाटण्यापेक्षा या वाहतूक सेवांना सरकारने पुरेसा निधी उपलब्ध करून द्यायला हवा. बेस्ट संपकऱ्यांविरोधात ‘मेस्मा’ लागू करूनही त्यांनी माघार घेतली नाही, यावरून त्यांच्या मागण्यांचे गांभीर्य सरकारने ओळखावे आणि त्वरित तोडगा काढावा.
- श्रीनिवास डोंगरे, दादर
---
मानसिकता बदलणे गरजेचे!
नदी-नाल्यांतून लाखो टन गाळ, कचरा काढला तरी त्या काही स्वच्छ होत नाही. कारण काठावर राहणारे, तेथून ये-जा करणारे लोक दररोज कचरा, नको असलेल्या वस्तू थेट नदी-नाल्यात टाकतात. नैसर्गिक गाळ खूप कमी तयार होतो; पण लोकांच्या या वाईट मानसिकतेमुळे दरवर्षी टनाने कचरा काढावा लागतो. त्यात वेळ व पैसा दोन्ही वाया जातो. पोईसर, मिठी, दहिसर अशा अनेक नद्या, नाल्यांची सफाई अर्धवट असल्याचे वृत्त वाचले. अनेकदा काढलेला गाळ, कचरा बाजूलाच टाकण्यात येतो आणि पाऊस पडल्यावर तो पुन्हा नाल्यात जातो, त्यामुळे लोकांची मानसिकता बदलणे अपरिहार्य आहे.
- लीना वालावलकर, कांदिवली
----
...मग सामान्य लोकांचं काय?
धाराशिव जिल्ह्यातील काँग्रेस नेते पवन राजेनिंबाळकर यांच्या हत्येच्या खटल्यात न्यायालयाने सर्व आरोपींची ठोस पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. त्यामुळे तपास यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर शंका येते. तसेच हा खून नेमका कोणी केला, असाही प्रश्न उपस्थित होतो. अशा महत्त्वाच्या घटनेच्या न्यायनिवाड्यास २० वर्षे लागत असतील, तर त्या निकालाला अर्थ तरी काय? एका वजनदार राजकीय नेत्याच्या हत्येबाबत असे घडत असेल तर सर्वसामान्य लोकांच्या खटल्यांबाबत विचारच न केलेला बरा. सामान्यांना तर कोणी कधीही मारून जाईल, त्याची दखल तर कोणीच घेत नाही , ‘एफआयआर’ दाखल केला की पोलिसांचं काम संपलं, मग त्यांना न्याय कसा मिळणार?
- अनिरुद्ध बर्वे, कल्याण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com