

विरार, ता. २२ (बातमीदार) : मुंबईलगतच्या वेगाने वाढणाऱ्या वसई-विरार शहरातील नागरिकांना हक्काच्या नाट्यगृहासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. नालासोपारा येथील मजेठिया परिसरात उभारण्यात येणाऱ्या महापालिकेच्या नाट्यगृहाचे काम १० जूनपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. मात्र, तांत्रिक अडचणी आणि अंतर्गत वीजजोडणीचे काम प्रलंबित असल्याने नाट्यगृह अद्यापही पूर्णत्वास जाऊ शकलेले नाही.
वसई-विरार शहर सांस्कृतिक नगरी म्हणून ओळखले जाते. साहित्य संमेलने, व्याख्याने, नाट्यप्रयोग, कवी संमेलने आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रम येथे नियमित होतात. मात्र, महापालिकेचे सुसज्ज नाट्यगृह नसल्याने स्थानिक कलाकार आणि संस्थांना खासगी सभागृहे किंवा महाविद्यालयांच्या हॉलवर अवलंबून राहावे लागते. वाढत्या भाड्यांमुळे अनेक कार्यक्रम रद्द करण्याची वेळ येते.
स्थानिक रंगकर्मी आणि रसिकांच्या दीर्घकालीन मागणीनंतर महापालिकेने मजेठिया येथे नाट्यगृह उभारण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, प्रशासनाच्या संथ कारभारामुळे गेल्या पाच वर्षांपासून हे काम रखडले आहे. सुरुवातीला साडेतीन कोटी रुपये असलेला प्रकल्प खर्च आता सहा कोटी रुपयांवर पोहोचला आहे.
अत्यावश्यक सुविधांचा आराखड्यात समावेश नाही
ध्वनिक्षेपण, वातानुकूलन आणि अग्निशमन यंत्रणा यांसारख्या अत्यावश्यक सुविधांचा मूळ आराखड्यात समावेश नसल्याने कामात विलंब झाला. मुख्य इमारत तयार असली तरी उर्वरित तांत्रिक कामे पूर्ण झाल्यानंतरच नाट्यगृहाचा पडदा उघडणार असल्याने वसईकरांची प्रतीक्षा कायम आहे.
नाट्यगृहातील वीजजोडणीच्या कामासाठी कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच या कामासाठी अतिरिक्त अडीच कोटी रुपयेदेखील महापालिकेकडून मंजूर करून घेण्यात आले आहेत. महापालिकेकडून या कामाची पाहणी करण्यात येत असून, ते लवकरात लवकर पूर्ण करून घेण्यात येईल.
- प्रदीप पाचंगे, शहर अभियंता
विरार : मजेठिया परिसरातील महापालिकेच्या नाट्यगृहाचे वीजजोडणीअभावी उद्घाटन लांबणीवर पडले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.