

भिवंडी, ता. २२ (बातमीदार) : शहरातील वाहिन्यांचे जाळे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी गंभीर समस्या ठरत आहे. टोरेंट पॉवरच्या वीजवाहिन्या, अनधिकृत वीजजोडण्या, भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल)च्या दूरसंचार वाहिन्या, इंटरनेट व वायफाय सेवा पुरवठादारांच्या तारांबरोबरच टीव्ही चॅनलच्या वाहिन्यांमुळे शहरातील अनेक भागांमध्ये धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. पथदिव्यांचे खांब, उड्डाणपुलांचे कठडे, विजेचे खांब, इमारतींच्या भिंती आणि इतर सार्वजनिक ठिकाणांवरून या वाहिन्या गेल्याने शहराचे विद्रुपीकरण होत आहे. सार्वजनिक कार्यक्रम, मिरवणुका आणि उत्सवांनाही अडथळे निर्माण होत आहेत.
गेल्या काही वर्षांत विविध वाहिन्यांचा प्रसार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. शहरातील अनेक भागांमध्ये आकाशाकडे पाहिले असता वाहिन्यांचे दाट जाळे दिसून येते. काही ठिकाणी ही परिस्थिती कोळ्याच्या जाळ्यासारखी झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. विशेषतः दिवंगत राजीव गांधी उड्डाणपूल परिसरातील कल्याण नाका भागात वाहिन्यांचे मोठे जाळे निर्माण झाले असून हा परिसर केबल नेटवर्कचे प्रमुख केंद्र बनला आहे.
उड्डाणपुलावर तसेच शहरातील पथदिव्यांच्या खांबांवर मोठ्या प्रमाणात वाहिन्या लटकलेल्या आहेत. दाट लोकवस्तीच्या भागांत आणि प्रमुख रस्ते-चौकांमध्ये बीएसएनएलच्या केबल्स व त्यांचे वितरण बॉक्स असुरक्षित अवस्थेत लटकलेले दिसतात. दुसरीकडे, टोरेंट पॉवरच्या अनेक वाहिन्या अद्याप पूर्णपणे भूमिगत झालेल्या नसून त्या इमारतींच्या भिंतींवर किंवा विजेच्या खांबांवरून जाताना दिसतात. काही ठिकाणी केबल्स रस्त्यांवरून आडव्या स्वरूपात गेल्याने अपघातांचा धोका निर्माण झाला आहे.
सेवा पुरवठादारांमध्ये नियोजनाचा अभाव
शहरात अनधिकृत वीज वापरासाठी टाकलेल्या वाहिन्यांचे स्वतंत्र जाळेही अनेक भागांत दिसून येत आहे. इंटरनेट आणि केबल सेवा पुरवठादारांनी कोणतेही नियोजन न करता महापालिकेच्या पथदिव्यांच्या खांबांचा वापर केल्यामुळे समस्या अधिकच गंभीर बनली आहे.
पोलिसांचे पालिकेला पत्र
वाढत्या समस्येची दखल घेत भिवंडी पोलिसांनी शहरातील धोकादायक व अनधिकृत वाहिन्या हटविण्यासाठी महापालिका प्रशासनाला पत्राद्वारे कारवाई करण्याची सूचना केली आहे. मात्र, अद्यापही ठोस उपाययोजना न झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे. शहरातील धोकादायक आणि विद्रुपीकरण करणाऱ्या वाहिन्यांचे नियोजनबद्ध व्यवस्थापन करून कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
प्रभाग कार्यालयांकडे पत्रव्यवहार
भिवंडी विद्युत विभाग आणि प्रभाग समिती कार्यालयांच्या माध्यमातून यापूर्वी धोकादायक वाहिन्यांच्या जोडणीविरोधात कारवाई केली आहे. अशा प्रकारची कारवाई करण्याचे अधिकार अतिक्रमण विभाग व संबंधित प्रभाग कार्यालयांना आहेत. याबाबत त्यांना लेखी पत्रव्यवहारही केला आहे, अशी माहिती भिवंडी महापालिकेचे वीज विभागाचे अधीक्षक रमेश घिगे यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.