

खारघर सेक्टर २० मध्ये रस्ते डांबरीकरणाचे काम अर्धवट
नागरिकांमध्ये नाराजी
खारघर, ता. २२ (बातमीदार) ः खारघर सेक्टर २० परिसरातील रस्ते डांबरीकरणाचे काम अर्धवट सोडण्यात आल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. पावसाळ्याच्या तोंडावर काम रखडल्यामुळे वाहनचालक आणि पादचाऱ्यांना गैरसोयींचा सामना करावा लागत आहे.
पनवेल महापालिकेच्या बांधकाम विभागामार्फत सेक्टर २० मधील गिरीराज, होरायझन व एम्पायर इस्टेट परिसरापासून मीरा सदनपर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण काही दिवसांपूर्वी सुरू करण्यात आले होते; मात्र रस्त्याच्या केवळ एका बाजूचे काम कस्तुरी हाइट्सपर्यंत पूर्ण करून पुढील काम थांबविण्यात आले.
दुसऱ्या दिवशी कामगार आणि यंत्रसामग्री पुन्हा परिसरात दाखल होऊन रस्त्याचे मोजमाप व मार्किंग करण्यात आले. त्यामुळे उर्वरित भागाचे डांबरीकरण लवकरच पूर्ण होईल, अशी अपेक्षा नागरिकांना होती; मात्र त्यानंतर काम पूर्णपणे बंद पडले असून कामगार अथवा पालिका कर्मचारी पुन्हा परिसरात फिरकलेले नाहीत.
कस्तुरी हाइट्सपासून मीरा सदनपर्यंतचा रस्ता अद्याप अपूर्ण अवस्थेत असल्याने वाहनचालक आणि पादचाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. पावसाळ्यात अर्धवट डांबरीकरणामुळे खड्डे, चिखल आणि वाहतूक कोंडीची समस्या अधिक गंभीर होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, यासंदर्भात प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी पनवेल महापालिकेचे मुख्य अभियंता संजय कटेकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.