रासायनीक पाण्यामुळे फ्लेमिंगोंचा अधिवास धोक्यात

रासायनीक पाण्यामुळे फ्लेमिंगोंचा अधिवास धोक्यात
Published on

रासायनिक पाण्यामुळे फ्लेमिंगोंचा अधिवास धोक्यात
डीपीएस तलावातील पाण्यात सापडले रासायनिक द्रव्ये

सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. २२ ः नवी मुंबईतील फ्लेमिंगो पक्ष्यांचा हक्काचा अधिवास आता विनाशाच्या उंबरठ्यावर उभा आहे. नेरूळ येथील डीपीएस फ्लेमिंगो तलावात भरतीच्या वेळी खाडीतील रासायनिक व दूषित पाणी शिरत असल्याने येथील संपूर्ण परिसंस्था धोक्यात आली आहे. नुकत्याच समोर आलेल्या वैज्ञानिक चाचण्यांनी आणि पर्यावरण अभ्यासकांच्या निरीक्षणांनी रामसर मानांकन लाभलेल्या ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्य परिसंस्थेबाबत अत्यंत गंभीर इशारा दिला आहे.
नॅशनल सेंटर फॉर सस्टेनेबल कोस्टल मॅनेजमेंटने अलीकडेच महाराष्ट्रातील २३ हजार ४१५ आर्द्रभूमींचे मॅपिंग आणि दस्तऐवजीकरण पूर्ण केले आहे; मात्र हा प्रकल्प पूर्ण होण्यास लागलेला १६ वर्षांचा विलंब राज्याच्या पर्यावरणीय धोरणातील उदासीनता दर्शवतो. या विलंबाच्या काळात उरण आणि मुंबई महानगर प्रदेशातील अनेक मौल्यवान आर्द्रभूमी नष्ट झाल्या आहेत. नैसर्गिक जलप्रवाहांमध्ये मानवनिर्मित बदल केल्याने पाण्याची गुणवत्ता, गाळाची रचना आणि जैवविविधतेवर विपरीत परिणाम होत असल्याचे नेचर जिओसायन्स या नियतकालिकात प्रकाशित झालेल्या संशोधनासह विविध वैज्ञानिक अभ्यासांमध्ये स्पष्ट झाले आहे.
नेरूळ येथील जलवाहतूक प्रवासी टर्मिनसच्या प्रवेश रस्त्याच्या बांधकामामुळे तलावाला जोडणारे मुख्य जलप्रवाह अवरुद्ध झाले आहेत. परिणामी, भरतीच्या वेळी पाणी आत येते; परंतु ते बाहेर जाऊ शकत नाही. पाणी साचून राहिल्यामुळे हे तलाव प्रदूषके साठवणारी बंदिस्त डबकी बनली आहेत, असे पर्यावरणतज्ज्ञ सी. एस. जॅकब आणि राज पुगलिया यांनी निदर्शनास आणून दिले आहे. बेलापूर-वाशी पट्ट्यातील आणि आजूबाजूच्या नागरी वस्त्यांमधील सांडपाणी थेट खाडीत आणि तेथून डीपीएस तलावात मिसळत आहे. महापालिकेच्या सांडपाणी प्रक्रिया केंद्रांची कार्यक्षमता आणि त्यांच्या मानकांचे योग्य पालन न होणे, हे यामागील मुख्य कारण आहे. हे केवळ पावसाचे पाणी वाहून नेणारे नाले राहिलेले नसून ते उघड्या गटारांचे रूप धारण करत आहेत, असे नॅटकनेक्टचे संचालक बी. एन. कुमार आणि पर्यावरणवादी ज्योती नाडकर्णी यांनी स्पष्ट केले आहे.

ऑक्सिजन संपला; मासे आणि डायटॉम्सचा मृत्यू
१ नॅटकनेक्ट फाउंडेशन आणि नवी मुंबई पर्यावरण संवर्धन संस्था यांच्या पुढाकाराने डीपीएस तलाव, एनआरआय आणि टीएस चाणक्य तलाव तसेच तलावात मिसळणाऱ्या नाल्याच्या पाण्याचे नमुने ठाण्यातील एसएसएएस प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले होते. प्रयोगशाळेच्या विश्लेषणातून समोर आलेली आकडेवारी भारतीय मानक संस्थेने निर्धारित केलेल्या आयएस या अंतर्गत पृष्ठभागीय जलगुणवत्ता मानकांचे उल्लंघन झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
२ पाण्यातील टीडीएसचे प्रमाण १९,६०० ते २१,७२० मिलीग्रॅम प्रति लिटरच्या आसपास आहे. यावरून हे स्पष्ट होते, की हे पाणी खारे राहिलेले नसून ते एक रासायनिक द्रावण बनले आहे. उच्च सामू आणि उच्च बीओडी यांचा एकत्रित परिणाम म्हणून पाण्यातील ऑक्सिजनची पातळी खालावली आहे.
३ ऑक्सिजनच्या अभावामुळे पाण्यात अ‍ॅनॉक्सिक परिस्थिती निर्माण होते. यामुळे मासे आणि डायटॉम्स मरण पावतात. अन्नसाखळीतील हा प्राथमिक स्तर कोलमडल्याने फ्लेमिंगो आणि इतर पक्ष्यांना अन्नाशिवाय राहावे लागते किंवा अधिवास बदलावा लागतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com