

गैरप्रकार करणाऱ्या डॉक्टरांवर कारवाईचा चाबूक
तीनही वैद्यकीय परिषदांचा दणका; ८३ जणांवर नोंदणी निलंबनाची कारवाई, २२१ तक्रारींचा निपटारा
भाग्यश्री भुवड ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २२ : राज्यातील डॉक्टरांविरुद्ध दाखल झालेल्या तक्रारींवर महाराष्ट्र वैद्यकीय परिषद, महाराष्ट्र भारतीय औषध प्रणाली परिषद आणि महाराष्ट्र होमिओपॅथी परिषद यांनी विविध प्रकारच्या कारवाया केल्या आहेत. ३१ मे २०२६ पर्यंत प्राप्त प्रस्तावांच्या आढाव्यानुसार तिन्ही परिषदांनी मिळून २२१ प्रकरणांवर निर्णय घेतला असून, ८३ डॉक्टरांचे नोंदणी प्रमाणपत्र निलंबित केले आहे.
यात महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेकडे सर्वाधिक १९३ प्रस्ताव प्राप्त झाले. त्यापैकी ६२ डॉक्टरांची नोंदणी निलंबित, ६० जणांना कारणे दाखवा नोटीस, २४ जणांना समुपदेशनात्मक सल्लापत्र, तर ७ जणांना पाच वर्षांसाठी नोंदणीमधून वगळण्याची कारवाई करण्यात आली. याशिवाय काही प्रकरणांमध्ये न्यायालयीन निर्दोष मुक्ततेमुळे किंवा इतर कारणांमुळे कारवाई करण्यात आली नाही. तर महाराष्ट्र भारतीय औषध प्रणाली परिषदेकडे १६ प्रस्ताव आले. त्यापैकी दोन डॉक्टरांची नोंदणी निलंबित करण्यात आली, तर १३ प्रकरणांमध्ये न्यायालयीन निर्दोष मुक्ततेमुळे कारवाईची आवश्यकता नसल्याचे नमूद करण्यात आले.
एक प्रकरण प्रक्रियेत आहे. तर महाराष्ट्र होमिओपॅथी परिषदेकडे १२ प्रस्ताव प्राप्त झाले. त्यापैकी १० डॉक्टरांची नोंदणी निलंबित, तर एका डॉक्टरचे नाव नोंदणीतून वगळण्यात आले आहे. एक प्रकरण अद्याप प्रक्रियेत आहे. आरोग्य क्षेत्रातील व्यावसायिक आचारसंहितेचे उल्लंघन, बनावट कागदपत्रे आणि इतर गैरप्रकारांविरोधात परिषदांनी कठोर भूमिका घेतल्याचे या आकडेवारीतून स्पष्ट होत असल्याचे निरीक्षकांचे मत आहे.
कारवाई आकडेवारीत
- एकूण तक्रारी : २२१
- नोंदणी निलंबन : ७४ (एमएमसी ६२ + एमसीआयएम २ + होमिओपॅथी १०)
- नोंदणीतून वगळले : ८ (एमएमसी ७ + होमिओपॅथी १)
- एकूण कठोर शिस्तभंगात्मक कारवाई : ८२
- नोटीस बजावलेल्या प्रकरणांची संख्या : ६०
- सल्लापत्र : २४
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.