

मसाला बाजारात दुर्गंधीचे साम्राज्य
नालेसफाईवर लाखो खर्च तरी गटारे तुंबली; घाण पाणी रस्त्यावर, प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह
जुईनगर, ता. २२ (बातमीदार) : राष्ट्रीय बाजार म्हणून ओळख असलेल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (एपीएमसी) मसाला बाजारात स्वच्छता आणि नालेसफाईच्या कामांचा बोजवारा उडाल्याचे चित्र समोर आले आहे. पावसाळ्याच्या तोंडावर नालेसफाईसाठी दरवर्षी लाखो रुपयांचा निधी खर्च केला जात असतानाही अनेक ठिकाणी गटारे तुंबल्याने सांडपाणी थेट रस्त्यावर साचत आहे. परिणामी संपूर्ण परिसरात दुर्गंधी पसरली असून, व्यापारी, माथाडी कामगार, वाहतूकदार आणि ग्राहकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.
मसाला बाजारातील अनेक पाकळ्यांमध्ये अद्याप नालेसफाई पूर्ण झालेली नसल्याची तक्रार व्यापाऱ्यांनी केली आहे. विशेषतः एल पाकळी परिसरात गटारातील सांडपाणी रस्त्यावर वाहत असून, त्यामुळे संपूर्ण परिसर अस्वच्छ झाला आहे. दुर्गंधीमुळे व्यापाऱ्यांना गाळ्यांच्या मागील बाजू बंद ठेवून केवळ समोरील बाजूने व्यवहार करावे लागत आहेत. गटारातील घाण पाणी दुकानांमध्ये शिरत असल्याने मालाचे नुकसान होण्याची भीतीही व्यक्त करण्यात येत आहे.
माथाडी कामगार आणि वाहतूकदारांनाही या परिस्थितीचा मोठा फटका बसत आहे. पावसाचे पाणी गटारातून वाहण्याऐवजी रस्त्यावर साचत असल्याने मालाची चढ-उतार, वाहतूक आणि दैनंदिन कामकाजात अडथळे निर्माण होत आहेत. बाजारातील अनेक भागांत मातीचे ढिगारे, कचरा आणि अस्वच्छता कायम असल्याने स्वच्छतेच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
दरवर्षी नालेसफाई, स्वच्छता आणि पावसाळी तयारीसाठी मोठा निधी खर्च केला जातो. यासंदर्भात बैठका, आढावा सभा आणि व्हिडिओ कॉन्फरन्स घेतल्या जात असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जातो. मात्र, प्रत्यक्षात परिस्थितीत कोणताही लक्षणीय बदल दिसून येत नसल्याने निधीचा वापर आणि कामांच्या गुणवत्तेबाबत व्यापाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे.
राष्ट्रीय बाजार संकल्पना राबविताना आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र, राज्याचे पणनमंत्री जयकुमार रावल हे बाजार समितीचे अध्यक्ष असतानाही स्वच्छता आणि मूलभूत सुविधांचे प्रश्न कायम असल्याने प्रशासनाविरोधात असंतोष वाढत आहे. आगामी काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता व्यक्त होत असून, तातडीने नालेसफाई पूर्ण करून संपूर्ण परिसरात स्वच्छता मोहीम राबवावी, अशी मागणी व्यापारी व कामगारांनी केली आहे.
चौकट
निधी खर्च होतो, पण परिणाम कुठे?
मसाला बाजारातील परिस्थितीमुळे नालेसफाई आणि स्वच्छतेसाठी खर्च होणाऱ्या सार्वजनिक निधीच्या परिणामकारकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरवर्षी लाखो रुपयांचा खर्च, नियमित आढावा बैठका आणि पावसाळी तयारीचे दावे होत असतानाही गटारे तुंबणे, रस्त्यावर सांडपाणी साचणे आणि अस्वच्छता कायम राहणे ही गंभीर बाब आहे. राष्ट्रीय बाजाराचा दर्जा असलेल्या एपीएमसीमध्ये मूलभूत स्वच्छतेची कामे प्रभावीपणे होत नसल्यास व्यापारी, ग्राहक आणि कामगारांच्या आरोग्यावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नालेसफाईच्या कामांचे स्वतंत्र लेखापरीक्षण, गुणवत्तेची तपासणी आणि जबाबदारी निश्चित करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.