

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २२ : पावसाचे अनियमित होत चाललेले वेळापत्रक आणि ग्रामीण भागातील वाढती पाणीटंचाई लक्षात घेता जलसंधारणाच्या कामांना महत्त्व प्राप्त झाले आहे. या पार्श्वभूमीवर लायन्स आणि रोटरी क्लबच्या संयुक्त पुढाकारातून ठाणे जिल्ह्यात यंदा ३७ नवे काँक्रीट बंधारे उभारण्यात आले. त्यातून सात कोटी ४० लाख लिटर अतिरिक्त जलसाठा निर्माण होणार आहे. या उपक्रमामुळे १८ हजार ५०० ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याचा लाभ मिळणार असून ७४० एकर क्षेत्रात दुबार पिके घेण्यास मदत होणार आहे.
जलतज्ज्ञ व कार्यकारी अभियंता हेमंत जगताप यांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्रामीण भागातील लहान नाले आणि ओहोळांवर काँक्रीट बंधारे उभारून पावसाचे पाणी अडविण्याची संकल्पना काही वर्षांपासून प्रभावीपणे राबवली जात आहे. या बंधाऱ्यांमुळे पावसाळा संपल्यानंतरही नाल्यांमध्ये पाणी टिकून राहते. परिणामी, परिसरातील विहिरींची पाणीपातळी वाढते, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात सुटतो; तसेच शेतीसाठी आवश्यक पाणी उपलब्ध राहते. बंधाऱ्यांमुळे मार्च-एप्रिलपर्यंत नाल्यांच्या पात्रात पाणी साठून राहत असल्याने शेतकऱ्यांना भाजीपाला, कडधान्ये आणि अन्य नगदी पिकांची लागवड करता येते. त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळते. याशिवाय जनावरांसाठीही वर्षभर पाण्याची उपलब्धता वाढण्यास मदत होते. यंदा उभारलेल्या ३७ बंधाऱ्यांसाठी विविध लायन्स आणि रोटरी क्लबने मिळून दोन कोटी सात लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. या कामांमुळे ५००हून अधिक शेतकऱ्यांना थेट फायदा होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
दरम्यान, लायन्सचे जिल्हा प्रांतपाल मनीष लडगे आणि रोटरीचे जिल्हा प्रांतपाल हर्ष मोकल यांच्या मार्गदर्शनाखाली हा जलसंधारण उपक्रम राबविण्यात आला. तसेच रोटरी जलयोद्धा समितीचे अरुण सपकाळे आणि तांत्रिक तज्ज्ञांच्या देखरेखीखाली बंधाऱ्यांची कामे पूर्ण करण्यात आली. ग्रामीण भागातील पाणीटंचाईवर दीर्घकालीन उपाय शोधण्याच्या दृष्टीने स्वयंसेवी संस्थांनी उभारलेले हे बंधारे जलसुरक्षेसह शेती आणि ग्रामविकासालाही बळ देणारे ठरत असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.
या ठिकाणी उभारले बंधारे
भिवंडी तालुक्यातील वेडवल, गोरथानपाडा, केल्टन, कुसापूर, लोहोपे, महाळुंगे, सावरोली, पिवळी, अघई, कुडवपाडा, कामदेपाडा, कुंदे आणि अंबाडी या भागांमध्ये लायन्स क्लबच्या माध्यमातून ३१ बंधारे उभारण्यात आले आहेत. तर मुरबाड तालुक्यातील मेर्दी, असोसे, उंबर्ली, रामपूर आणि दुधनोली येथे रोटरी क्लबच्या सहकार्याने सहा नवीन बंधारे बांधण्यात आले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.