घरकुल लाभार्थ्यांचे प्रलंबित हप्ते तातडीने द्या

घरकुल लाभार्थ्यांचे प्रलंबित हप्ते तातडीने द्या
Published on

टोकावडे, ता. २२ (बातमीदार) : मुरबाड तालुक्यातील देवगाव पंचायत समिती गणातील तसेच देवगाव, देवे, मासले बेलपाडा, धानिवली आणि फणसोली ग्रामपंचायत हद्दीतील घरकुल लाभार्थ्यांचे प्रलंबित हप्ते तातडीने वितरित करण्यात यावेत, अशी मागणी माजी सभापती श्रीकांत गणपत धुमाळ यांनी केली आहे. यासाठी त्यांनी पंचायत समिती प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू केला आहे.
श्रीकांत धुमाळ यांनी पंचायत समिती मुरबाडच्या गटविकास अधिकारी लता गायकवाड यांची भेट घेऊन घरकुल लाभार्थ्यांच्या प्रलंबित हप्त्यांच्या प्रश्नावर सविस्तर चर्चा केली. यावेळी त्यांनी संबंधित लाभार्थ्यांच्या खात्यावर उर्वरित हप्ते तातडीने जमा करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली. अनेक लाभार्थ्यांना घरकुल योजनेअंतर्गत पहिला हप्ता मिळाला असून त्यांनी घरबांधणीची कामे पूर्ण केली आहेत. मात्र, पुढील हप्ते अद्याप मंजूर न झाल्याने अनेक कुटुंबांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. परिणामी, घरकुलांची कामे रखडण्याची वेळ लाभार्थ्यांवर आली आहे.
काही ठिकाणी संबंधित यंत्रणांकडून आवश्यक पाठपुरावा आणि प्रशासकीय कार्यवाही वेळेत होत नसल्याने पात्र लाभार्थी पुढील हप्त्यांपासून वंचित राहत असल्याचेही निवेदनात नमूद केले आहे. त्यामुळे देवगाव, देवे, मासले बेलपाडा, धानिवली आणि फणसोली येथील सर्व पात्र लाभार्थ्यांना उर्वरित हप्ते तातडीने वितरित करावेत, अशी मागणी धुमाळ यांनी केली. घरकुल योजनेचा लाभ वेळेत मिळाल्यास अपूर्ण घरे पूर्ण होऊन लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळेल. त्यामुळे प्रशासनाने या प्रश्नाची गांभीर्याने दखल घेऊन त्वरित कार्यवाही करावी, अशी अपेक्षा लाभार्थ्यांकडून व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com