अपघातग्रस्ताला वाहतूक पोलिसांची गोल्डन अवर''मध्ये मदत

अपघातग्रस्ताला वाहतूक पोलिसांची गोल्डन अवर''मध्ये मदत
Published on

पनवेल पोलिसांची देवदूतासारखी धाव
गोल्डन अवरमध्ये अपघातग्रस्ताला खासगी वाहनातून रुग्णालयात केले दाखल
पनवेल, ता. २३ (बातमीदार) ः पनवेल-जेएनपीटी महामार्गावरील करंजाडे परिसरात झालेल्या एका अपघातात वाहतूक पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे एका व्यक्तीचे प्राण वाचले आहेत. जखमीची प्रकृती चिंताजनक असल्याचे पाहून, पोलिसांनी ॲम्बुलन्सची वाट न पाहता त्याला तातडीने एका खासगी वाहनातून रुग्णालयात हलवले. अपघातानंतरच्या महत्त्वाच्या अशा सुवर्णक्षणात (गोल्डन अवर) मिळालेल्या मदतीमुळे जखमीला जीवदान मिळाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, करंजाडे येथील रहिवासी प्रदीप दास (वय ४१) हे पळस्पे ते अटल सेतू मार्गावर रस्ता ओलांडत असताना भरधाव चारचाकीने त्यांना धडक दिली. यामध्ये त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. याच वेळी उरणकडे जात असलेले वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अतुल दहिफळे यांच्या निदर्शनास ही घटना आली. त्यांनी तात्काळ वाहन थांबवून परिस्थितीचा आढावा घेतला आणि जखमीची प्रकृती गंभीर असल्याचे लक्षात येताच त्यांनी क्षणाचाही विलंब न करता खासगी वाहनातून त्यांना उपचारासाठी कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात रवाना करण्याच्या सूचना दिल्या. तसेच घटनेची माहिती पनवेल वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक औदुंबर पाटील यांना दिली.

रुग्णालयात पोहोचली तातडीची मदत
माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक औदुंबर पाटील यांनी बीट मार्शल पोलिस हवालदार अमीर मुलाणी आणि पोलिस शिपाई सुरेश जौंजाळ यांना तातडीने रुग्णालयात पाठवून जखमी व्यक्तीस आवश्यक मदत व उपचार मिळतील याची दक्षता घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार दोन्ही पोलिस कर्मचाऱ्यांनी रुग्णालय प्रशासनाशी समन्वय साधून उपचार प्रक्रिया सुरळीत सुरू होण्यासाठी आवश्यक मदत केली.

नागरिकांकडून कौतुकाचा वर्षाव
सध्या प्रदीप दास यांच्यावर एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती वैद्यकीय देखरेखीखाली आहे. या संपूर्ण घटनेत वाहतूक पोलिसांनी दाखवलेली तत्परता, निर्णयक्षमता आणि मानवतावादी भूमिका विशेष उल्लेखनीय ठरली आहे. अपघातानंतरच्या सुवर्णक्षणात (गोल्डन अवर) जखमीला उपचार मिळवून देण्यासाठी घेतलेल्या तातडीच्या निर्णयामुळे त्याचा जीव वाचण्यास मदत झाली. या कार्याबद्दल नागरिकांकडून वाहतूक पोलिसांचे कौतुक होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com