हवामान बदलाचा आरोग्यावर परिणाम

हवामान बदलाचा आरोग्यावर परिणाम
Published on

हवामान बदलाचा आरोग्यावर परिणाम
ताप, सर्दी, खोकला आणि श्वसनविकारांच्या रुग्णांत वाढ; तज्ज्ञांचा इशारा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २३ : शहरात गेल्या काही दिवसांपासून उष्णता, दमट वातावरण, अधूनमधून होणारे हवामानातील बदल आणि पावसाच्या सुरुवातीमुळे हंगामी आजारांचे प्रमाण वाढत असल्याचे चित्र आहे. सर्दी, खोकला, ताप आणि इतर व्हायरल संसर्गांसह श्वसनविकारांच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
तज्ज्ञांच्या मते, वाढते प्रदूषण, बांधकामांमधून उडणारी धूळ आणि बदलते हवामान यामुळे वरच्या श्वसनमार्गाच्या संसर्गाचे प्रमाण वाढले आहे. पूर्वी दोन-तीन दिवसांत बरा होणारा सर्दी-खोकला आता सात ते दहा दिवस टिकत असून, काही रुग्णांमध्ये खोकला दोन ते तीन आठवड्यांपर्यंत कायम राहत आहे. काही प्रकरणांमध्ये ब्रॉन्कायटिसची लक्षणेही दिसून येत आहेत.
गेल्या महिनाभरात फ्लूसदृश आजारांच्या रुग्णांमध्ये वाढ झाली असून, मागील वर्षाच्या तुलनेत अशा रुग्णांची संख्या २० ते ३० टक्क्यांनी वाढल्याचा अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला आहे. ताप, घसा खवखवणे, सर्दी, कफ, नाक वाहणे, थकवा आणि अशक्तपणा ही प्रमुख लक्षणे आढळत आहेत. विशेषतः दमा, सीओपीडी, ब्रॉन्कायटिस किंवा इतर फुप्फुसविकार असलेल्या रुग्णांनी अधिक सावध राहण्याची गरज असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे.
अशा रुग्णांमध्ये साधा फ्लूदेखील गंभीर स्वरूप धारण करू शकतो. त्यामुळे फ्लू आणि न्यूमोकोकल (न्युमोव्हॅक्स) लसीकरण करून घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
डॉक्टरांनी थंड पेये आणि अतिथंड पदार्थ टाळणे, पुरेसे पाणी पिणे, संतुलित आहार घेणे, व्हिटॅमिन ‘सी’युक्त पदार्थांचा आहारात समावेश करणे तसेच स्वच्छता राखण्याचे आवाहन केले आहे. सर्दी, ताप किंवा श्वास घेण्याचा त्रास दीर्घकाळ कायम राहिल्यास तातडीने वैद्यकीय सल्ला घ्यावा, असेही त्यांनी सांगितले.

सध्या मुंबईत हवामानात सातत्याने बदल होत आहेत. कधी तीव्र उष्णता, तर कधी दमट वातावरण निर्माण होत आहे. त्‍यामुळे सर्दी, खोकला, व्हायरल ताप, अस्थमा आणि ब्रॉन्कायटिससारख्या श्वसनविकारांचे प्रमाण वाढू शकते. नागरिकांनी पुरेसे पाणी पिणे, धुळीपासून बचाव करणे, संतुलित आहार घेणे आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यावर भर देणे आवश्यक आहे.
- डॉ. हेतल मारफातिया, प्रमुख, कान-नाक-घसा विभाग, केईएम रुग्णालय

हवामानातील सतत होणारे बदल आणि पावसाळ्यात व्हायरल संसर्गाचा धोका वाढतो. विशेषतः सीओपीडी, दमा किंवा इतर फुप्फुसविकार असलेल्या रुग्णांनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे. अशा रुग्णांमध्ये साधा फ्लूदेखील गंभीर स्वरूप धारण करू शकतो. त्यामुळे २०२६ मधील उपलब्ध फ्लू लस घेणे महत्त्वाचे आहे. इन्फ्लुएन्झाची लस दरवर्षी अद्ययावत केली जाते.
- डॉ. प्रीती मेश्राम, विभागप्रमुख, पल्मनरी मेडिसिन विभाग व सहाय्यक प्राध्यापक, जे. जे. रुग्णालय

उच्च जोखमीच्या गटातील आणि दम्याचा त्रास असलेल्या रुग्णांनी फ्लू व न्यूमोव्हॅक्स लसीकरण करून घ्यावे, जेणेकरून आजार गंभीर होणार नाही. गेल्या महिनाभरात फ्लूसदृश आजारांचे प्रमाण वाढले असून, विशेषतः श्वसनविकार असलेल्या रुग्णांनी अधिक काळजी घेणे आवश्यक आहे.
- डॉ. विनायक सावर्डेकर, वैद्यकीय अधीक्षक, सेंट जॉर्ज रुग्णालय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com