कोट्यवधी खर्चूनही कोरडेच नळ

कोट्यवधी खर्चूनही कोरडेच नळ
Published on

कोट्यवधी खर्चूनही नळ कोरडेच
जलजीवन मिशननंतरही पनवेल तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाणीटंचाई; १० गावांसह १८ वाड्या अजूनही टँकरवर अवलंबून
पनवेल, ता. २३ (बातमीदार) : केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी जलजीवन मिशनअंतर्गत ग्रामीण भागातील प्रत्येक घरापर्यंत शुद्ध पिण्याचे पाणी पोहोचविण्याचा संकल्प करण्यात आला असला, तरी पनवेल तालुक्यात या योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी अद्याप अपूर्णच असल्याचे चित्र समोर आले आहे. सुमारे १४४ कोटी रुपयांचा निधी मंजूर होऊनही १३३ पैकी केवळ ४८ पाणीपुरवठा योजना पूर्ण झाल्या असून, तब्बल ८३ योजना रखडल्या आहेत. परिणामी उन्हाळ्याच्या तडाख्यात तालुक्यातील १० गावे आणि १८ वाड्यांतील सुमारे १८ हजार ५५३ नागरिकांना आजही नऊ टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे.
ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या माहितीनुसार, निधीच्या टप्प्याटप्प्याने उपलब्धतेमुळे अनेक कामांचा वेग मंदावला आहे. ५६ योजनांची प्रगती ७५ टक्क्यांपेक्षाही कमी असून, काही कामे विविध तांत्रिक आणि प्रशासकीय कारणांमुळे थांबली आहेत. त्यामुळे ‘हर घर जल’ची घोषणा कागदावरच राहिल्याची भावना ग्रामस्थांमध्ये निर्माण झाली आहे. कोट्यवधी रुपयांचा खर्च झाल्यानंतरही अनेक घरांतील नळ कोरडेच असल्याने नागरिक प्रशासनाला जाब विचारत आहेत. रखडलेल्या योजना लवकर पूर्ण करून ग्रामीण भागाला नियमित पाणीपुरवठा कधी मिळणार, हा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे.
चौकट
जागेअभावामुळे १६ योजना रखडल्या
जलजीवन मिशनअंतर्गत पनवेल तालुक्यातील १६ योजनांना आवश्यक जागा आणि पाणीपुरवठ्याचा स्रोत उपलब्ध नसतानाच मंजुरी देण्यात आल्याची बाब समोर आली आहे. जमीन संपादन आणि जलस्रोत निश्चित न झाल्यामुळे या योजनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरूच होऊ शकलेली नाही. प्राथमिक सर्वेक्षणातील त्रुटींमुळे नियोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, या प्रकरणाची चौकशी करून रखडलेल्या योजनांबाबत स्पष्ट भूमिका घ्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
चौकट
टँकरवरच नागरिकांची तहान भागते
जलजीवन मिशनची कामे अपूर्ण राहिल्याने पनवेल तालुक्यातील आपटा, माडभुवन, पाले बुद्रुक, कोलवाडी, बारदोली, मोहो, शिरढोण, चेरवली आदी १० गावे आणि १८ वाड्यांमध्ये आजही टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. सध्या नऊ टँकरच्या माध्यमातून सुमारे १८ हजार ५५३ नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले जात असून, कायमस्वरूपी जल योजना पूर्ण होईपर्यंत टँकरवरची ही अवलंबित्वाची साखळी तुटण्याची चिन्हे दिसत नाहीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com