

मुंब्र्यात १५ वर्षीय मुलीची आत्महत्या
खासगी व्हिडिओ व्हायरल केल्याने तिघांवर कारवाई
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २३ : मुंब्रा येथील कौसा परिसरात एका मुलीचा खासगी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने मानसिक तणावात आलेल्या १५ वर्षीय मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नुकतीच घडली. या घटनेत सुसाईड नोट सापडली असून, याप्रकरणी दोन युवकांसह एका युवतीविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्या समवयस्क तिघांना ताब्यात घेतले आहे. तसेच त्यांची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आल्याची माहिती तपास अधिकारी तथा सहाय्यक पोलिस निरीक्षक रोहित केदार यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत मुलीची त्या परिसरातील एका युवकाशी ओळख होती. दोघांमधील काही खासगी फोटो व व्हिडिओ संबंधित युवकाच्या मोबाईलमध्ये होते. त्यानंतर झालेल्या वादानंतर युवकाचा मोबाईल त्याच्या मित्राकडे गेला. त्याच मोबाईलमधील मुलगी व युवकाचे आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आल्याचा त्या युवकावर आरोप आहे. हे व्हिडिओ पाहिल्यानंतर मुलगी मानसिक तणावाखाली गेली होती. समाजात बदनामी झाल्याची भावना व्यक्त करीत ती अस्वस्थ झाली. गुरुवारी (ता. १८) सायंकाळी घरात एकटीच असताना तिने ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. कुटुंबीयांनी तिला तत्काळ खाली उतरविले; मात्र तिचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून संबंधित दोन्ही युवकांविरोधात सुरुवातीला गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांना ताब्यात घेऊन चौकशीत आणखी एका युवतीचे नाव पुढे आले. त्यानुसार तिलाही ताब्यात घेत बाल न्यायालयात हजर केले. त्यानंतर त्यांना बाल सुधारगृहात ठेवण्याचे आदेश दिले आहेत. याप्रकरणी मुंब्रा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.