

महागाईचे चटके
गृहिणीची घरगुती बजेट कोलमडले
भाजीपाला, फळे आणि फुलांच्या वाढत्या दरांमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त
वाशी, ता. २३ (बातमीदार) ः नवी मुंबईतील सर्वसामान्य नागरिकांना सध्या वाढत्या महागाईचा मोठा फटका बसत असून, भाजीपाला, फळे आणि फुलांच्या गगनाला भिडलेल्या दरांमुळे मध्यमवर्गीय व कामगार वर्गाचे आर्थिक गणित पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. वाशी येथील एपीएमसी बाजारात भाजीपाल्याची आवक घटल्याने आणि वाहतूक खर्च वाढल्याने किरकोळ बाजारात सर्वच वस्तूंचे दर भडकले आहेत.
व्यापाऱ्यांच्या मते, अवकाळी पाऊस, बदलते हवामान, उत्पादनात झालेली घट, वाहतूक खर्चातील वाढ आणि इंधन दरवाढ यामुळे बाजारात मालाची आवक कमी झाली आहे. काही भागांत पिकांचे नुकसान झाल्याने पुरवठ्यावर परिणाम झाला असून मागणीच्या तुलनेत उपलब्धता कमी असल्याने दर वाढले आहेत. नवी मुंबईतील वाशी, तुर्भे, नेरुळ, बेलापूर, घणसोली, कोपरखैरणे आणि ऐरोली परिसरातील किरकोळ बाजारपेठांमध्ये नागरिकांना दररोज वाढत्या किंमतींचा सामना करावा लागत आहे. पूर्वी ५०० रुपयांत आठवडाभराचा भाजीपाला खरेदी करणाऱ्या कुटुंबांना आता त्यासाठी ७५० ते ८५० रुपये खर्च करावे लागत आहेत. तर महिन्याच्या घरखर्चात सरासरी १५ ते २० टक्क्यांनी वाढ झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
पावसाळ्याच्या काळात वाहतूक आणि साठवणुकीच्या समस्या वाढल्यास दर आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती नियंत्रणात ठेवण्यासाठी शासनाने प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नवी मुंबईकरांकडून केली जात आहे.
भाजीपाल्याचे दर ४० ते ८० टक्क्यांनी वाढले
बाजारातील आकडेवारीनुसार मे महिन्याच्या तुलनेत जून महिन्यात अनेक भाज्यांच्या दरात ४० ते ८० टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे.
टोमॅटो ः घाऊक दर १६ ते १८ रुपयांवरून ३१ रुपयांपर्यंत पोहोचला असून किरकोळ बाजारात तो ५० ते ८० रुपये किलो दराने विकला जात आहे.
भेंडी ः दर २८ ते ३२ रुपयांवरून ४३ रुपयांपर्यंत गेला असून किरकोळ बाजारात ती ७० ते ८० रुपये किलो दराने विकली जात आहे. दोडका, कारली, वांगी, गवार, मिरची आणि कोथिंबीर यांच्या दरातही वाढ झाली आहे. कोथिंबिरीची जुडी ः पूर्वी १० ते १५ रुपयांना मिळत होती ती आता २५ ते ३० रुपयांना विकली जात आहे.
हिरव्या मिरची ः दर ६० रुपयांवरून १२० रुपये किलोपर्यंत पोहोचला आहे.
फळांचा गोडवा कमी; फुलांची दरवाढ
आंब्याचा हंगाम संपत आल्याने दर्जेदार आंब्यांचे दर वाढले आहेत. सफरचंद १८० ते २५० रुपये किलो, डाळिंब २०० ते ३०० रुपये किलो तर संत्री १२० ते १८० रुपये किलो दराने विकली जात आहेत. तर, झेंडू ८० ते १२० रुपये किलो, मोगरा २५० ते ४०० रुपये किलो झाले आहेत. तर गुलाब फुलांच्या दरातही सुमारे ३० ते ४० टक्के वाढ झाली आहे. त्यामुळे देवपूजा, विवाह सोहळे, वाढदिवस आणि विविध सामाजिक कार्यक्रमांचा खर्च वाढला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.