वसई विरार महापालिकेत नियंत्रण कक्ष कार्यान्वित

वसई विरार महापालिकेत नियंत्रण कक्ष कार्यान्वित
Published on

विरार, ता. २४ (बातमीदार) : पावसाळ्यातील पूरस्थिती, इमारत दुर्घटना आणि अन्य नैसर्गिक आपत्तींना तातडीने प्रतिसाद देण्यासाठी वसई-विरार महापालिकेने ‘एकत्रित आपत्ती नियंत्रण कक्ष’ कार्यान्वित केला आहे. महापालिका मुख्यालयाच्या तिसऱ्या मजल्यावर उभारलेल्या या कक्षाचे उद्‍घाटन महापौर अजीव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

आगामी काळात शहरातील सीसीटीव्ही जाळे आणि स्वयंचलित हवामान केंद्रे या नियंत्रण कक्षाशी जोडली जाणार आहेत. त्यामुळे हवामानातील बदल आणि शहरातील विविध भागांतील परिस्थितीची माहिती त्वरित उपलब्ध होऊन मदतकार्याचे नियोजन अधिक प्रभावीपणे करता येणार आहे. अग्निशमन विभागातील १५ जवानांना ‘राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल’ (एनडीआरएफ)मार्फत विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे.

वसई-विरार शहरात वाढत्या नागरीकरणामुळे पावसाळ्यात सखल भागांत पाणी साचणे, पूरस्थिती निर्माण होणे तसेच जुन्या इमारतींच्या दुर्घटना घडण्याच्या घटना वाढल्या आहेत. अशा परिस्थितीत विविध विभागांमध्ये त्वरित समन्वय साधून मदतकार्य प्रभावीपणे राबविण्याच्या उद्देशाने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. यापूर्वी विविध यंत्रणांचे स्वतंत्र नियंत्रण कक्ष असल्याने माहितीची देवाणघेवाण आणि निर्णय प्रक्रियेत विलंब होत होता. ही अडचण दूर करण्यासाठी महापालिका, महावितरण, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, पोलिस आणि महसूल विभाग यांचे प्रतिनिधी या नियंत्रण कक्षात २४ तास तैनात असणार आहेत.

पावसाळा आणि नागरिकांच्या सुरक्षेला आमचे सर्वोच्च प्राधान्य असून, कोणत्याही संभाव्य संकटाचा सामना करण्यासाठी महापालिका प्रशासन आणि सर्व यंत्रणा पूर्णपणे सज्ज आहेत.
- पृथ्वीराज बी. पी., आयुक्त, वसई-विरार महापालिका

आपत्कालीन परिस्थितीत माहिती मिळावी आणि त्यावर लगेच कार्यवाही करता यावी, यासाठी हा नियंत्रण कक्ष अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. हा कक्ष चोवीस तास कार्यरत राहील.
- अजीव पाटील, महापौर, वसई-विरार महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com