

राष्ट्रीय बाजार जलमय
पहिल्याच पावसात व्यापारी-ग्राहकांची मोठी गैरसोय
जुईनगर, ता. २४ (बातमीदार) ः राष्ट्रीय दर्जा प्राप्त झालेल्या एपीएमसी परिसरात पहिल्याच पावसाने दाणादाण उडवली आहे. यामुळे संपूर्ण बाजार परिसर जलमय झाला असून, व्यापारी, हमाल, कामगार आणि ग्राहकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. अनेक ठिकाणी गुडघाभर पाण्यातून वाहन आणि नागरिकाना वाट काढावी लागत होती.
नालेसफाई, गटरलाइन दुरुस्ती आणि रस्त्यांच्या काँक्रीटीकरणावर कोट्यवधींचा खर्च केल्याचा दावा केला जात असतानाही बाजार परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने व्यापारी, हमाल, कामगार आणि ग्राहकांना मोठा त्रास सहन करावा लागला. भाजीपाला, मसाला व फळ बाजाराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरच पाणी तुंबल्याने ग्राहकांची मोठी गैरसोय झाली. बाजारात येणाऱ्या वाहनांनाही अडचणींचा सामना करावा लागत होता. यामुळे मालाची वाहतूक, खरेदी-विक्री आणि दैनंदिन व्यवहारांवर परिणाम झाल्याचे दिसून आले.
दरवर्षी पावसाळ्यात उद्भवणाऱ्या समस्यांवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी बाजार घटकांकडून केली जात आहे. दरम्यान, पहिल्याच पावसात बाजाराची ही अवस्था झाल्याने आगामी मुसळधार पावसात संपूर्ण बाजार परिसर पाणी आणि घाणीच्या विळख्यात सापडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे प्रशासन आता या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन ठोस आणि प्रभावी उपाययोजना करणार का, याकडे बाजारातील सर्व घटकांचे लक्ष लागले आहे.
कोट्यवधींचा खर्च पाण्यात
१ विशेष म्हणजे, पावसाळ्यापूर्वीच या प्रवेशद्वारासमोरील रस्ता खोदून नव्याने काँक्रीटीकरण करण्यात आले होते. या कामासाठी सुमारे ७० लाख रुपये खर्च झाल्याची चर्चा असताना, पहिल्याच पावसात पुन्हा पाणी साचल्याने बाजार घटकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
२ बाजारातील विविध विंगमध्ये यापूर्वी गटरलाइन आणि जलनिस्सारण व्यवस्थेच्या कामांवर अंदाजे सहा ते आठ कोटी रुपये खर्च करण्यात केल्याची माहिती आहे. मात्र, एवढा निधी खर्च होऊनही पाण्याचा निचरा सुरळीत होत नसल्याने व्यापाऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.