

वज्रेश्वरी, ता. २४ (बातमीदार) : पावसाला सुरुवात होताच भिवंडी तालुक्यातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. वज्रेश्वरी, दुगाड, अकलोली, घोटगाव, अंबाडी, वेढेगाव आणि परिसरात झालेल्या पावसामुळे जमिनीत आवश्यक ओलावा निर्माण झाला असून खरीप हंगामाच्या तयारीला वेग आला आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग पुन्हा एकदा शेतात सक्रिय झाला आहे.
ग्रामीण भागात भात हे प्रमुख पीक असल्याने शेतकरी पेरणीपूर्व मशागतीच्या कामात व्यस्त झाले आहेत. अनेक ठिकाणी ट्रॅक्टरच्या साह्याने नांगरणी, वखरणी आणि शेत समतल करण्याची कामे सुरू झाली आहेत. तर काही भागांत पारंपरिक पद्धतीने बैलांच्या साह्याने मशागत केली जात आहे. पावसाचा जोर वाढताच प्रत्यक्ष पेरणीच्या कामांना सुरुवात करण्याची तयारी सुरू झाली आहे. पावसामुळे जमिनीतील कोरडेपणा कमी झाला असून शेतजमिनीत ओलावा टिकून असल्याने उखळणीची कामे लवकरच सुरू होतील, अशी माहिती दुगाड येथील प्रगतशील महिला शेतकरी माधुरी पाटील यांनी दिली.
दरम्यान, हवामान विभागाने पुढील काही दिवसांत पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज वर्तविल्याने ग्रामीण भागात पेरणीपूर्व हालचालींना आणखी वेग आला आहे. खरीप हंगाम हा शेतकऱ्यांच्या आर्थिक घडीसाठी महत्त्वाचा मानला जात असल्याने उशिरा का होईना आलेल्या पावसामुळे आशावादी वातावरण निर्माण झाले आहे.
पूर्वतयारीची कामे पूर्ण
एप्रिल आणि मे महिन्यातच शेतकऱ्यांनी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर बांधबंदिस्ती, शेतातील नाल्यांची साफसफाई, पाण्याच्या निचऱ्याची व्यवस्था, तण काढणे तसेच कृषी अवजारांची दुरुस्ती यांसारखी तयारीची कामे पूर्ण केली होती. काही शेतकऱ्यांनी बियाणे आणि खतांची खरेदी करून त्यांचा साठाही करून ठेवला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.