जेजे रुग्णालयाची दोन वर्षांपासून प्रतीक्षा

जेजे रुग्णालयाची दोन वर्षांपासून प्रतीक्षा
Published on

जनआरोग्य योजनेत रोबोटिक
शस्त्रक्रियांचा समावेश कधी?
जे. जे. रुग्णालयाची दोन वर्षांपासून प्रतीक्षा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २४ : राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना अत्याधुनिक उपचारांचा लाभ मिळावा, यासाठी जे. जे. रुग्णालयाने महात्मा जोतीराव फुले जनआरोग्य योजनेत रोबोटिक आणि बॅरिएट्रिक शस्त्रक्रियांचा समावेश करण्याचा प्रस्ताव सादर केला; मात्र दोन वर्षांनंतरही त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. त्यामुळे भविष्यात सर्वसामान्य रुग्णांना रोबोटिक शस्त्रक्रिया मोफत करता येईल का, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान, हा विषय शासनाच्या धोरणात्मक निर्णयाशी संबंधित असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
जे. जे. रुग्णालय हे राज्य सरकारच्या अखत्यारीतील एकमेव रुग्णालय असून, येथे रोबोटिक शस्त्रक्रिया केल्या जातात. या तंत्रज्ञानामुळे कमी रक्तस्राव, लहान जखमा, कमी वेदना आणि लवकर बरे होण्यास मदत होते; मात्र या शस्त्रक्रियांसाठी लागणारी विशेष उपकरणे आणि वापरानंतर बदलाव्या लागणाऱ्या सामग्रीचा खर्च मोठा आहे. रोबोटिक आणि बॅरिएट्रिक शस्त्रक्रियांचा महात्मा फुले योजनेत समावेश करण्याबाबत दोन वर्षांपूर्वी प्रस्ताव पाठवला होता; मात्र अद्याप त्यावर निर्णय झाला नसल्याचे जे. जे. रुग्णालय समूहाचे अधिष्ठाता डॉ. अजय भांडारवार यांनी सांगितले. ९ एप्रिल २०२५ रोजी रुग्णालयात पहिली रोबोटिक शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर आतापर्यंत २६० हून अधिक शस्त्रक्रिया झाल्या आहेत. सध्या रुग्णांकडून कोणतेही शुल्क आकारले जात नसले, तरी रोबोटसोबत मिळालेला सुमारे ५०० शस्त्रक्रियांसाठीचा कन्झ्युमेबल्सचा साठा संपल्यानंतर अडचणी निर्माण होऊ शकतात. प्रत्येक शस्त्रक्रियेमागे केवळ कन्झ्युमेबल्सवरच सुमारे एक ते दीड लाख रुपयांचा खर्च येतो. सध्या काही शस्त्रक्रिया लॅप्रोस्कोपिक पॅकेजअंतर्गत करण्याचा प्रयत्न सुरू आहे; मात्र रोबोटिक शस्त्रक्रियांचा योजनेत समावेश न झाल्यास भविष्यात हा खर्च रुग्णालयाला किंवा रुग्णांनाच उचलावा लागू शकतो, असे शल्यचिकित्सा विभागप्रमुख डॉ. गिरीश बक्षी यांनी सांगितले.
सध्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना दरवर्षी पाच लाख रुपयांपर्यंत कॅशलेस उपचार मिळतात. जे. जे. रुग्णालयातील डॉक्टरांच्या मते, रोबोटिक आणि बॅरिएट्रिक शस्त्रक्रियांचा या योजनेत समावेश झाल्यास राज्यभरातील लाखो गरजू रुग्णांना अत्याधुनिक उपचारांची संधी उपलब्ध होऊ शकते.
--------
निर्णय शासनदरबारी!
दरम्यान, राज्य आरोग्य हमी सोसायटीचे सहाय्यक संचालक डॉ. रवींद्रकुमार शेट्ये यांनी जे. जे. रुग्णालयाकडून दोन वर्षांपूर्वी प्रस्ताव प्राप्त झाल्याची पुष्टी केली. योजनेत कोणते उपचार समाविष्ट करायचे, याचा निर्णय शासनाच्या अभ्यास समितीद्वारे घेतला जातो. सध्या विविध उपचार आणि शस्त्रक्रियांचा टप्प्याटप्प्याने योजनेत समावेश करण्यात येत असून, पूर्वी १३५६ उपचारांवरून ही संख्या वाढून २३९९ पर्यंत पोहोचली आहे. दरम्यान, शासकीय रुग्णालयांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर रोबोटिक शस्त्रक्रिया सुरू असून, भविष्यात या उपचारपद्धतीचाही योजनेत समावेश होण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com