

दिबांच्या नावासाठी तरुण पेटून उठले तर मी आजही नेतृत्व करायला तयार : भारती पोवार
महेंद्र घरत यांनीही दिबांना केले अभिवादन
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. २४ : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू होऊन सहा महिने झाले. आता लवकरच आंतरराष्ट्रीय विमानेही उडतील; परंतु लोकनेते दि. बा. पाटील साहेब यांचे नाव अद्याप विमानतळाला दिले गेले नाही, ही मोठी शोकांतिका आहे. सरकारला दिबांच्या नावाची अॅलर्जी आहे. कारण त्यांना त्यांच्या बॉसचे नाव द्यायचे आहे, अशी घणाघाती टीका १९८४च्या ऐतिहासिक भूमिपुत्र आंदोलनातील रणरागिणी भारती पोवार यांनी केली.
आज दिबांचा स्मृतिदिन असल्याने कोल्हापूरवरून भारती पोवार दिबांना अभिवादन करण्यासाठी आल्यात होत्या. जासई येथे दिबांच्या आठवणी दाटून आल्याने भारती यांना अश्रू अनावर झाले. त्यानंतर त्यांनी पनवेल येथील संग्राम बंगल्यावर दिबांना अभिवादन केले. त्यांच्यासह नेते महेंद्र घरत हेही उपस्थित होते. या वेळी त्या पुढे म्हणाल्या, की १९८४च्या आंदोलनावेळी साहजिकच दिबांचा आदेश शिरसावंद्य मानून आंदोलनासाठी कशाचीही तमा न बाळगता आले होते. वाहतुकीची फार साधने नसल्याने बहुतांश गावे पायीच फिरले. हातावर पोट असणाऱ्या महिलांना जमीन संपादन विषय समजून सांगितला. सरकार कशा पद्धतीने शेतकरीवर्गाची फसवणूक करतेय आणि दि. बा. पाटील आपल्या जमिनीला योग्य मोबदला मिळावा म्हणून लढत आहेत, हेही ठासून सांगितले. त्यामुळे गावोगावी आंदोलनाचे वारे पसरले. त्यामुळेच ज्या दिवशी जमीन संपादन करण्यात येणार होती, त्यास विरोध करण्यासाठी लाखो भूमिपुत्र रस्त्यावर उतरले. सरकारला कुठल्याही परिस्थितीत हे आंदोलन चिरडायचे होते. साहजिकच पोलिस आणि एसआरपी तयारीनिशी होते. त्याचा जो परिणाम व्हायचा तोच झाला. पोलिसांनी अश्रू धुराच्या नळकांड्या फोडल्या आणि बेछूट गोळीबारही केला. त्यात पाच हुतात्मे झाले. ते केवळ सरकारच्या बिनडोकपणामुळे. दि. बा. पाटील यांच्या खंबीर नेतृत्वामुळेच शेतकऱ्यांना काही अंशी न्याय मिळाला. कालांतराने साडेबारा टक्के जमिनीचे सूत्र देशभर लागू झाले ते दिबांमुळेच. तसेच मंडल आयोगाचा लढाही दिबांनी यशस्वी केला. त्यामुळे ओबीसी समाजाला फायदा झाला. परंतु ओबीसी समाजाला दिबांचे महत्त्व समजलेच नाही, अशी खंतही पोवार यांनी व्यक्त केली.
दि. बा. पाटील हे देशासाठी, तत्त्वासाठी जगलेले नेते, परंतु आताच्या सरकारला सर्वसामान्य जनतेला न्याय मिळावा म्हणून आयुष्य वेचणारा दिबांसारखा नेता चालत नाही, असे सध्याचे सरकारचे आचरण पाहता मला वाटते. वास्तविक नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनप्रसंगीच दिबांचे नाव लागायला हवे होते, पण सरकारने शेतकऱ्यांचा केसाने गळा कापला, असे माझे ठाम मत आहे. त्यामुळे आता नवी मुंबई विमानतळ नावासाठी तरुण पेटून उठले तर मी नेतृत्वाची धुरा सांभाळायला तयार आहे, असे भारती पोवार म्हणाल्या.
सरकार भूमिपुत्रांचा अंत पाहतेय : महेंद्र घरत
दि. बा. पाटील हे आमची अस्मिता आहेत. ते देशातील अठरापगड जातींतील समाजाचे नेते होते. अशा महान लोकनेत्याचा सरकारला विसर पडला आहे. मुख्यमंत्र्यांनी अनेक वेळा सांगितले, की दिबांचे नाव विमानतळाला दिले जाईल. मग उद्घाटन होऊन आणि आंतरराष्ट्रीय विमानांचे उड्डाण होईपर्यंत तयारी झाली आहे, तरीही दिबांचे नाव अद्याप का नाही? भूमिपुत्रांचा सरकार अंत पाहत आहे का? थोडक्यात सरकारने झोपेचे सोंग घेऊन भूमिपुत्रांच्या तोंडाला पाने पुसलीत, हे लांच्छनास्पद आहे, अशी टीका महेंद्र घरत यांनी केली. या वेळी रश्मिता पोपेटा यांनी दिबांच्या नावासाठी आमरण उपोषण सुरू केले आहे. त्या ठिकाणी भारती पोवार, महेंद्र घरत यांनी भेट दिली आणि उपोषणास पाठिंबा दिला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.