रायगड डान्सबारमुक्त करण्यासाठी मनसेचा इशारा

रायगड डान्सबारमुक्त करण्यासाठी मनसेचा इशारा
Published on

रायगडच्या डान्स बारमुक्तीसाठी मनसेचा इशारा
१९ जुलैपासून आमरण उपोषण
पनवेल, ता. २४ (बातमीदार) : रायगड जिल्ह्यातील सर्व डान्स व ऑर्केस्ट्रा बार कायमस्वरूपी बंद करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पनवेल शहराध्यक्ष योगेश जनार्दन चिले यांनी १९ जुलैपासून आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. यासंदर्भात त्यांनी नवी मुंबई पोलिस परिमंडळ-३चे पोलिस उपायुक्तांना निवेदन दिले आहे.
रायगड ही छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असल्याने या जिल्ह्यात डान्स बार सुरू असणे अयोग्य असल्याचे चिले यांनी निवेदनात म्हटले आहे. वर्धा जिल्ह्यात सेवाग्राम आश्रमाच्या सन्मानार्थ दारूबंदी लागू करण्यात आली असून, त्याच धर्तीवर रायगडमध्येही डान्स बार बंदी लागू करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
रायगडमधील अधिकृत व अनधिकृत डान्स बार तातडीने बंद न झाल्यास पनवेल येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ उपोषण सुरू करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला. तसेच पनवेल तालुक्यात मोठ्या प्रमाणावर लेडीज बार सुरू असल्याचा आरोप करीत अवैध धंद्यांवर पोलिसांची कारवाई अपुरी असल्याची टीकाही त्यांनी केली. प्रशासनाने रायगडचा सन्मान आणि शिवरायांच्या विचारांचा आदर राखण्यासाठी तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी त्यांनी केली आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com