अपुऱ्या बळावर अग्निशमन दल

अपुऱ्या बळावर अग्निशमन दल
Published on

संजय भोईर : सकाळ वृत्तसेवा
भिवंडी, ता. २४ : आग, दुर्घटना आणि आपत्कालीन परिस्थितीत सर्वप्रथम धाव घेणाऱ्या भिवंडी महापालिकेच्या अग्निशमन दलाला सध्या मनुष्यबळाच्या तीव्र कमतरतेचा सामना करावा लागत आहे. अत्याधुनिक वाहने आणि यंत्रसामुग्री उपलब्ध असूनही नोकरभरती रखडल्याने अग्निशमन दलावर अतिरिक्त कामाचा ताण पडत असल्याचे वास्तव समोर आले आहे.
भिवंडी शहरासह ग्रामीण भागातील गोदामपट्ट्यांमध्ये आगीच्या घटना सातत्याने घडत असतात. अशा वेळी जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान अहोरात्र कार्यरत असतात. मात्र, वाढती लोकसंख्या, विस्तारित कार्यक्षेत्र आणि अपुरे मनुष्यबळ यामुळे यंत्रणेवर मोठा ताण निर्माण झाला आहे. भिवंडी तालुक्याची लोकसंख्या १४ लाख असून त्यापैकी १० लाखांहून अधिक नागरिक शहरात वास्तव्यास आहेत. याशिवाय ग्रामीण भागात हजारो गोदामे कार्यरत आहेत. त्यामुळे शहराबरोबरच ग्रामीण गोदामपट्ट्यासाठी स्वतंत्र अग्निशमन यंत्रणेची आवश्यकता वारंवार अधोरेखित होत आहे. मात्र, आजही शहर, ग्रामीण आणि आसपासच्या परिसरातील आगींच्या घटनांना प्रतिसाद देण्याची जबाबदारी भिवंडी महापालिकेच्या अग्निशमन दलावरच आहे.

मंजूर पदांपैकी बहुतांश रिक्त
अग्निशमन विभागात मुख्य अग्निशमन अधिकारी आणि उपमुख्य अग्निशमन अधिकारी ही महत्त्वाची पदे रिक्त असून त्यांचा अतिरिक्त कार्यभार प्रभारी अधिकाऱ्यांकडे आहे. उपकेंद्र अधिकाऱ्यांच्या १२ मंजूर पदांपैकी ११, वाहक ऑपरेटरच्या ३१ पदांपैकी ३०, लीडिंग फायरमनच्या १५ पदांपैकी १४ आणि फायरमनच्या १०० पदांपैकी ५४ पदे रिक्त आहेत. महापालिकेच्या अग्निशमन दलात एकूण १६५ मंजूर पदे असून त्यापैकी केवळ ४४ पदे भरलेली आहेत. परिणामी तब्बल १२१ पदे रिक्त आहेत. ही तूट भरून काढण्यासाठी महापालिकेच्या इतर विभागांतील वाहनचालकांची मदत घ्यावी लागत असल्याची माहिती समोर आली आहे.

वाहनांची संख्या अधिक; कर्मचारी अपुरे
भिवंडी अग्निशमन दलाकडे अत्याधुनिक साधनसामुग्री उपलब्ध आहे. विभागाकडे एक फायर वॉटर टॉवर, एक ॲडव्हान्स रेस्क्यू व्हॅन, आठ फायर इंजिन, पाच मल्टीपर्पज फोम टेंडर, पाच वॉटर ब्राउझर, सात मिनी फायर इंजिन, दोन फायर अँड रेस्क्यू व्हॅन, एक फायर जीप आणि तीन फायर बाइक्स अशी एकूण ३३ वाहने आहेत. मात्र, ही यंत्रणा कार्यक्षमतेने वापरण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने अनेक वाहनांचा पूर्ण क्षमतेने वापर होत नसल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे फायर दुचाकी वर्षभरापासून वापराविना पडून असल्याची माहिती आहे.

ग्रामीण गोदामपट्ट्यात स्वतंत्र केंद्राची गरज
भिवंडीच्या ग्रामीण भागात ५० हजारांहून अधिक गोदामे आहेत. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांचा माल येथे साठवला जातो. लाखो नागरिक रोजगारासाठी या भागात ये-जा करतात. २००९ पासून या परिसराच्या विकासाची जबाबदारी एमएमआरडीएकडे सोपविली असली तरी स्वतंत्र अग्निशमन केंद्र उभारण्याकडे दुर्लक्ष झाल्याची टीका होत आहे. २०२१ मध्ये तत्कालीन खासदार कपिल पाटील यांनी या प्रश्नाबाबत पत्रव्यवहार केला होता. त्यावेळी एमएमआरडीएकडून स्वतंत्र अग्निशमन केंद्राला मंजुरी दिल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, पाच वर्षांनंतरही ही यंत्रणा कार्यान्वित झालेली नाही. त्यामुळे प्रकल्पाची अंमलबजावणी नेमकी का रखडली, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

आगींमध्ये ग्रामीण भाग आघाडीवर
२०२२ ते २०२५ या चार वर्षांच्या कालावधीत भिवंडी शहरात ५१९, तर ग्रामीण भागात ४०१ आगीच्या घटनांची नोंद झाली आहे. ग्रामीण भागातील वाहतूक कोंडी, अरुंद व खराब रस्ते; तसेच पाण्याच्या कमतरतेमुळे आग विझविताना अग्निशमन दलाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. अनेक वेळा रसायनयुक्त गोदामांतील आग दोन-दोन दिवस धुमसत राहते. अशा वेळी ठाणे, कल्याण आणि उल्हासनगर येथील अग्निशमन दलाची मदत घ्यावी लागते.

अग्निशमन दलाची सद्यस्थिती
मंजूर पदे : १६५
भरलेली पदे : ४४
रिक्त पदे : १२१
उपलब्ध वाहने : ३३
शहरातील आगी (२०२२-२५) : ५१९
ग्रामीण भागातील आगी (२०२२-२५) : ४०१

Marathi News Esakal
www.esakal.com