

भारतीय निवडणूक आयोगाचा कर्मचारी असल्याची बतावणी करून गंडा
अंधेरी, ता. २८ (बातमीदार) ः भारतीय निवडणूक आयोगाचा कर्मचारी असल्याची बतावणी करून एका वृद्धाला एपीके फाईल पाठवून त्यात त्यांची वैयक्तिक माहिती भरण्यास प्रवृत्त करून अज्ञात सायबर ठगाने त्यांच्या मोबाईलसह बँक खाते हॅक करून सुमारे दहा लाखांचे ऑनलाइन व्यवहार केल्याचा प्रकार अंधेरीत उघडकीस आला आहे. वृद्धाच्या तक्रारीवरून अंधेरी पोलिसांनी अज्ञात सायबर ठगाविरुद्ध अपहारासह फसवणूक आणि आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपासाला सुरुवात केली आहे. ७३ वर्षांचे वयोवृद्ध तक्रारदार अंधेरी येथे राहत असून शेअरमार्केटमध्ये काम करतात.
१७ ऑगस्टला त्यांना एका अज्ञात मोबाईलवरून मॅसेज आला होता; मात्र कामात व्यस्त असल्याने त्याकडे लक्ष दिले नव्हते. २० ऑगस्टला त्यांनी मॅसेजमध्ये दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला होता. या वेळी समोरील व्यक्तीने तो भारतीय निवडणूक आयोगाचा कर्मचारी असल्याचे सांगून फोन कट केला. काही वेळानंतर त्यांना त्याच मोबाईलवरून व्हिडिओ कॉल आला होता. त्याने त्यांना एक लिंक पाठवून त्यांची माहिती अपलोड करण्यास सांगितली. त्यांना बोलण्यात गुंतवून त्याने त्यांचा आधार कार्ड, मतदान ओळखपत्रासह इतर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्याने फॉर्मचे पाच रुपये भरण्यास सांगितले. त्यांनी क्रेडिट कार्डवरून पाच रुपये पेमेंट करण्याचा प्रयत्न केला; मात्र ते पेमेंट झाले नाही. त्याने फोन होल्डवर ठेवून त्यांना एक एपीके फाईल पाठविली. त्यांनी ती फाईल ओपन करून पुन्हा पेमेंट करण्याचा सल्ला दिला. त्यांनी पेमेंट करण्याचा प्रयत्न केला; मात्र पेमेंट झाले नाही. या वेळी त्याने मीच पैसे ट्रान्स्फर करण्याचा प्रयत्न करतो, असे सांगून त्यांचा मोबाईलसह बँक खात्याचा कंट्रोल स्वतःकडे घेऊन काही ऑनलाइन व्यवहार केले होते.
बँकेतून ऑनलाइन व्यवहार झाल्याचे मॅसेज प्राप्त होताच त्यांना संंबंधित व्यक्तीने भारतीय निवडणूक आयोगाचा कर्मचारी असल्याची बतावणी करुन ही फसवणूक केल्याचे निदर्शनास आले होते. या घटनेनंतर त्यांनी दोन्ही बँकेचे क्रेडिट कार्ड ब्लॉक करून अंधेरी पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात सायबर ठगाविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
दुचाकीसह मोबाईल चोरीच्या गुन्ह्यातील सराईत आरोपीस अटक
अंधेरी, ता. २८ (बातमीदार) ः दुचाकीसह मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांतील एका रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगाराला आंबोली पोलिसांनी दोन दिवसापूर्वी अटक केली. अर्जुन ऊर्फ राजू सहानी ऊर्फ अर्जा असे या २६ वर्षीय आरोपीचे नाव असून त्याच्याकडून पोलिसांनी चोरीच्या तीन दुचाकी आणि ११ मोबाईल जप्त केले आहेत.
अटकेनंतर त्याला स्थानिक न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे. यातील तक्रारदार तरुण जोगेश्वरी येथे राहत असून डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतो. १९ ऑगस्टला तो डिलिव्हरीसाठी अंधेरीतील लोखंडवाला कॉम्प्लेक्स परिसरात आला होता. या वेळी त्याची दुचाकी अज्ञात व्यक्तीने चोरी करून पलायन केले होते. या घटनेनंतर त्याने आंबोली पोलिसांत तक्रार केली होती. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला होता. आरोपी वर्सोवा, म्हाडा परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रवीण पाटील, पोलिस निरीक्षक सचिन बंडगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक प्रदीप फुंदे, पोलिस अंमलदार विक्रम कुंभार, यादव मोरे, राजेंद्र चव्हाण, सागर चव्हाण, सचिन साखरे, योगेश नरळे यांनी तिथे साध्या वेशात पाळत ठेवून अर्जुन सहानीला ताब्यात घेतले होते. तपासात अर्जुन हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असल्याचे उघडकीस आले. त्याच्याविरुद्ध वर्सोवा सहा, आंबोली तीन, बांगुरनगर दोन, अंधेरी रेल्वे मोहीम, सांताक्रूझ, कुरार, वांद्रे रेल्वे पोलिस ठाण्यात प्रत्येकी एक अशा १६ दुचाकींसह मोबाईल चोरीचे गुन्हे दाखल असल्याचे उघडकीस आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.