‘श्रावण सुंदरी’चा रविवारी महाअंतिम सोहळा

‘श्रावण सुंदरी’चा रविवारी महाअंतिम सोहळा
Published on

‘श्रावण सुंदरी’चा रविवारी महाअंतिम सोहळा
वसईत ४० स्पर्धकांमध्ये रंगणार अंतिम फेरी; सिने कलाकारांचीही उपस्थिती
विरार ता. २८ (बातमीदार) : सौंदर्य, आत्मविश्वास, व्यक्तिमत्त्व आणि कलागुणांना व्यासपीठ देणाऱ्या ‘श्रावण सुंदरी २०२६’ या बहुचर्चित स्पर्धेचा भव्य महाअंतिम सोहळा रविवारी (ता. ३०) दुपारी २.३० वाजल्यापासून अनंतराव ठाकूर नाट्यगृह, विशेष वंशीय क्षत्रिय भंडारी समाज हॉल, पारनाका, वसई (पश्‍चिम) येथे आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याचे माध्यम प्रायोजक ‘सकाळ’ आहे. या सोहळ्यासाठी सिने अभिनेते उपस्थित राहणार असल्याने श्रावण सुंदरी स्पर्धेची रंगत वाढणार आहे.
यंग स्टार्स ट्रस्ट, विरार आणि वसई तालुका कला-क्रीडा विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येणाऱ्या या स्पर्धेचे शीर्ष प्रायोजक वामन हरी पेठे ज्वेलर्स आहेत. ‘श्रावण सुंदरी’च्या यंदाच्या पर्वात मिस श्रावण सुंदरी, मिसेस श्रावण सुंदरी आणि एलिट श्रावण सुंदरी अशा तीन विभागांमध्ये स्पर्धा घेण्यात आली. विविध टप्प्यांनंतर आता अंतिम सोहळ्यासाठी एकूण ४० स्पर्धकांची निवड झाली असून, त्यामध्ये मिस श्रावण सुंदरी विभागातील १४, मिसेस श्रावण सुंदरी विभागातील १२ आणि एलिट श्रावण सुंदरी विभागातील १४ स्पर्धकांचा समावेश आहे. स्पर्धक हे वसई विरारसह नेदरलँड, वर्धा, पुणे, रत्नागिरी, पनवेल, मुंबई, ठाणे येथील असल्याने आता वसईची ही स्पर्धा आंतरराष्ट्रीय पातळीवरही जाऊन पोहोचली आहे. या महाअंतिम सोहळ्याचा प्रवेश विनामूल्य असून, वसई-विरार परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून अंतिम स्पर्धकांचा उत्साह वाढवावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
सेलिब्रिटी मार्गदर्शक ऋजुता देशमुख यांच्या विशेष मार्गदर्शनाचे सत्रही आयोजित करण्यात आले आहे. त्यामुळे अंतिम स्पर्धकांना मनोरंजन क्षेत्रातील अनुभवातून व्यक्तिमत्त्व विकास व सादरीकरणाबाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन मिळणार आहे.
या सोहळ्याला माजी आमदार क्षितिज ठाकूर उद्‍घाटक म्हणून तर माजी महापौर प्रवीणा ठाकूर या विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. मराठी मनोरंजनसृष्टीतील तुषार दळवी, पुष्कर श्रोत्री, मिलिंद इंगळे, मानसी नाईक, फुलवा खामकर, पराग शहाणे, चंदा वनमाळी यांच्यासह इतर मान्यवर कलाकारांचीही खास उपस्थिती या सोहळ्याला लाभणार आहे.

प्रशिक्षण सत्रांचे आयोजन
महाअंतिम सोहळ्याच्या तयारीसाठी अंतिम स्पर्धकांसाठी विशेष ग्रूमिंग व प्रशिक्षण सत्रांचे आयोजन करण्यात आले. या सत्रांमध्ये स्पर्धकांना नृत्यदिग्दर्शन, व्यावसायिक छायाचित्रण, योग, व्यक्तिमत्त्व विकास, रंगमंचीय सादरीकरण याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. विशेषतः स्पर्धकांचा आत्मविश्वास वाढविणे, स्टेजवर प्रभावी सादरीकरण करणे, व्यक्तिमत्त्व खुलविणे आणि अंतिम फेरीसाठी आवश्यक असलेली तयारी करून घेणे यावर या प्रशिक्षणामध्ये भर देण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com