

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २८ : सार्वजनिक ठिकाणे, निर्जन परिसर आणि इमारतींचे आडोसे ही ठिकाणे अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्यांना सुरक्षित वाटत असली, तरी ठाणे पोलिसांची त्यांच्यावर करडी नजर आहे. गांजा आणि अन्य अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कारवाईची मोहीम तीव्र केली आहे. जानेवारी ते जुलै या सात महिन्यांत अमली पदार्थांच्या सेवनाचे तब्बल एक हजार ३३२ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अमली पदार्थांची विक्री व तस्करी रोखण्याबरोबरच सेवन करणाऱ्यांवरही कारवाई करण्यावर पोलिसांनी भर दिला आहे.
ठाणे पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत विविध ठिकाणी अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्यांवर नियमितपणे कारवाई केली जात आहे. विशेषतः सार्वजनिक ठिकाणी किंवा निर्जन परिसरात तसेच इमारतींच्या आडोशाला गांजासह अन्य अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्यांवर पोलिसांकडून लक्ष ठेवले जात आहे. आयुक्तालयाच्या हद्दीतील ३४ पोलिस ठाण्यांच्या माध्यमातून ही कारवाई सुरू आहे. या कारवाईत परिमंडळ २ आघाडीवर आहे.
कारवाईसोबत जनजागृतीची जोड
अमली पदार्थांच्या सेवनाला आळा घालण्यासाठी केवळ कारवाई पुरेशी नसल्याने पोलिसांनी जनजागृतीवरही भर दिला आहे. विशेषतः महाविद्यालयीन तरुणांमध्ये नशेचे प्रमाण वाढत असल्याने विद्यार्थ्यांना अमली पदार्थांच्या दुष्परिणामांची माहिती देऊन त्यांना व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.
विक्रेत्यांसह सेवन करणाऱ्यांवरही लक्ष
अमली पदार्थांची विक्री आणि तस्करी रोखणे हे पोलिसांच्या कारवाईतील प्रमुख उद्दिष्ट असले तरी त्याचबरोबर अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्यांवरही लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. त्यामुळे नशेच्या आहारी गेलेल्या व्यक्तींवर कारवाईचा बडगा उगारला जात आहे. सार्वजनिक ठिकाणे, निर्जन परिसर आणि इमारतींचे आडोसे या ठिकाणी सुरू असलेल्या सेवनावरही पोलिसांकडून नियमित कारवाई केली जात आहे.
तरुणांमध्ये जागृती
‘नशामुक्त ठाणे’चा संदेश तरुणांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी रील आणि पोस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सामाजिक माध्यमांचा प्रभावी वापर करून विद्यार्थ्यांमध्ये अमली पदार्थांविरोधात जागृती निर्माण करण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे. विद्यार्थ्यांचा आणि समाजाचा सक्रिय सहभाग वाढवून नशेविरोधातील मोहिमेला व्यापक स्वरूप देण्यावर पोलिसांचा भर आहे.
सेवन रोखण्याचे पोलिसांसमोर आव्हान
सात महिन्यांत नोंदविण्यात आलेल्या १,३३२ सेवनाच्या गुन्ह्यांमुळे अमली पदार्थांचे सेवन रोखण्याचे आव्हान स्पष्ट झाले आहे. या कारवाईत ठाणे शहराचा वाटा सर्वाधिक असून, त्यानंतर भिवंडी, कल्याण आणि उल्हासनगर या भागांतही कारवाई करण्यात आली आहे. अमली पदार्थांचे सेवन हा तरुणांच्या भवितव्याशी निगडित गंभीर सामाजिक प्रश्न असल्याने कारवाईसोबतच जनजागृती, विद्यार्थ्यांचा सहभाग आणि समाजाच्या सक्रिय सहभागातून ‘नशामुक्त ठाणे’ अभियान राबविण्यावर पोलिसांचा भर आहे.
परिमंडळ सेवन गुन्हे
परिमंडळ १ ३१४
परिमंडळ २ ३७७
परिमंडळ ३ २३६
परिमंडळ ४ १६१
परिमंडळ ५ २४४
एकूण १,३३२
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.