पाठ्यपुस्तकी ज्ञानापेक्षा कौशल्य विकासाला प्राधान्य

पाठ्यपुस्तकी ज्ञानापेक्षा कौशल्य विकासाला प्राधान्य
Published on

पाठ्यपुस्तकी ज्ञानापेक्षा कौशल्य विकासाला प्राधान्य
‘सकाळ’तर्फे आयोजित गोलमेज परिषदेत तज्‍ज्ञांचे मत
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २८ ः जागतिक स्तरावर उपयोजित तंत्रज्ञानाच्या सहायाने सहयोगात्मक कृती साधून उच्च शिक्षणाचे भवितव्य अधिक उज्ज्वल साधता येते. पाश्चिमात्य देशांनी आता पाठ्यपुस्तकी ज्ञान कमी केले असून, प्रात्यक्षिक कौशल्य विकासावर अधिक भर देण्यात येत आहे. असे मत स्पेनमधील आयई विद्यापीठाचे संचालक प्रा. मॅन्युएल मुनिझ यांनी व्यक्त केले. ते मुंबईत ‘सकाळ मीडिया ग्रुप’तर्फे आयोजित ‘उच्च शिक्षणाचे भवितव्य’ या विषयावरील गोलमेज परिषदेत बोलत होते.
सध्या अमेरिकी देशांनी पारपत्रांची अट कठोर केल्याने जगभरातील विद्यार्थ्यांचा तेथे शिकायला जाण्याचा ओघ कमी झाल्याचे लक्ष्यात येते. तथापि, विद्यार्थ्यांनी आपला मोर्चा आता इतर युरोपियन देशाकडे वळविला आहे. स्पेनमध्ये तर ९० टक्के उच्च शिक्षण हे इंग्रजी भाषेतून होते. त्यामुळे विद्यार्थी येथे बऱ्यापैकी स्थिरावतात. उद्योग जगत आणि शैक्षणिक संस्था एकत्र येऊन सहयोगात्मक कृती केल्यास उच्च शिक्षणाचे उज्ज्वल भवितव्य साधता येते. भारताला तशी मोठी संधी उपलब्ध आहे, असेही प्रा. मुनिझ पुढे म्हणाले.
प्रास्ताविक ‘सकाळ’चे वरिष्ठ एचआरबी व्यवस्थापक समीरन गव्हाणे यांनी करून ‘एपीजी’ उद्योग समूहाची व्यावसायिक महती विशद केली. या गोलमेज परिषदेत नवी मुंबईतील पिल्लई विद्यापीठाच्या अधिष्ठाता डॉ. दीपिका शर्मा, सहयोगी अधिष्ठाता डॉ. कविता कठारे, फिनोमेनाय या कृत्रिम बुद्धिमत्तेचे ज्ञान पुरविणाऱ्या कंपनीचे संचालक संजय रॉड्रिग्ज आणि स्ट्रॅटेजिक फोरसाइट ग्रुपच्या जयंती कुट्टे यांनी आपली मते मांडली.

नव्या शैक्षणिक धोरणाचा फज्जा
याप्रसंगी मुंबई विद्यापीठाच्या संज्ञापन व पत्रकारिता विभागाचे प्राध्यापक डॉ. सुंदर राजदीप म्हणाले, की सध्या भारतात विद्यार्थी व प्राध्यापक यांचे गुणोत्तर प्रमाण १०० : १ आहे. म्हणजे १०० विद्यार्थ्यांमागे केवळ एक प्राध्यापक उच्च शिक्षणाचे धडे देत असताना गुणवत्ता टिकविणे शक्य होत नाही. नवे शैक्षणिक धोरण राबविताना गुणवत्तेला मोठा फटका बसला आहे. शासकीय धोरण लागू करताना आधी मनुष्यबळ व पायाभूत सुविधा उपलब्ध करणे आवश्यक होते, मात्र तसे झाले नाही. परिणामी या सुविधेअभावी नव्या शैक्षणिक धोरणाचा फज्जा उडाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com