राजकीय हेतूने गोवल्याचा आदित्य ठाकरेंचा दावा

राजकीय हेतूने गोवल्याचा आदित्य ठाकरेंचा दावा
Published on

राजकीय हेतूने गोवल्याचा आदित्य ठाकरेंचा दावा
दिशा सालियन मृत्यूप्रकरणी न्यायालयाने निकाल ठेवला राखून

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २८ : आपल्याविरोधात कोणतीही तक्रार नसतानाही निव्वळ राजकीय हेतूने याप्रकरणी आपल्याला गोवले जात असल्याचा युक्तिवाद शुक्रवारी (ता. २८) हस्तक्षेप अर्जाद्वारे शिवसेनेचे (ठाकरे गट) आमदार आदित्य ठाकरे यांनी केला. दरम्यान, याप्रकरणी सर्व पक्षकारांचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर उच्च न्यायालयाने आपला निकाल राखून ठेवला.

दिवंगत अभिनेता सुशांत सिह राजपूतची माजी व्यवस्थापक दिशा सालियनचा मृत्यू आत्महत्या नसून तिच्या लैंगिक अत्याचार केल्यानंतर हत्या करण्यात आल्याचा दावा तिच्या वडिलांनी याचिकेतून केला आहे. त्या याचिकेवर न्या. सारंग कोतवाल आणि न्या. आर. आर. भोंसले यांच्या खंडपीठासमोर तीन दिवस नियमित सुनावणी सुरू होती. त्या वेळी याचिकेत हस्तक्षेप अर्ज केलेल्या आदित्य ठाकरेंकडून युक्तिवाद करण्यात आला. याप्रकरणी आपल्याविरोधात कोणताही गुन्हा दाखल केलेला नाही. तसेच कुणाच्यातरी सांगण्यावरून यात कारवाई करणे योग्य ठरणार नाही. रशीद खान पठाण यांनी तक्रार केली, तेव्हा सतीश सालियन यांच्या वतीने कुठलीही तक्रार देण्यात आली नाही. केवळ ऐकीव माहितीच्या आधारे आपल्याविरोधात आरोप करणे हे केवळ राजकीय वैरातून सूड उगवण्यासारखे असल्याचा युक्तिवाद ठाकरे यांच्या वतीने ज्येष्ठ वकील सुदीप पासबोला यांनी केला.

दिशाच्या वडिलांबाबतीत पूर्ण संवेदना
खासदार नारायण राणे तसेच त्याचे पुत्र आणि आमदार नितेश राणे यांनी राजकीय हेतूने प्रेरित आपल्याविरोधात आरोप केल्याचे ठाकरेंकडून न्यायालयाला सांगण्याचा प्रयत्न केला. ठाकरेंना याचिकाकर्त्यांबाबत पूर्ण सहानुभूती आहे. त्यांच्या शंकेचे निरसन होऊन त्यांच्या प्रश्नांची उत्तर मिळालीच पाहिजेत. दिशाच्या वडिलांच्या बाबतीत पूर्ण संवेदना आहे; पण त्यांच्या मुलीच्या मृत्यूवरून जे काही राजकारण सुरू आहे ते थांबायला हवे, असेही त्यांनी न्यायालयाला सांगण्याचा प्रयत्न केला.

न्यायालयाकडून प्रश्नांची सरबत्ती
दिशाच्या शरीरावर कपडे नव्हते, असा रुग्णालयामधील पंचनाम्याचा उल्लेख आहे का, मग ते कपडे कोणी काढले, संबंधित डॉक्टरांचा जबाब का नोंदवला नाही का, असे प्रश्न न्यायालयाने उपस्थित केले; मात्र यात काहीही तथ्य नसून दिशाचा आत्महत्येनंतरचा रुग्णालयातील फोटो न्यायालयात दाखवण्यात आला, त्यामध्ये तिने कपडे घातले होते; परंतु इतक्या उंचावरून पडूनही फक्त तोंडातूनच रक्त कसे आले?, तोंडावर आणि शरीरावर बाकी कुठल्याही मोठ्या जखमा का नाहीत, असे प्रश्न न्यायालयाने पुन्हा उपस्थित केले. दिशा उंचावरून पडताना तोंडावर पडली होती, तिच्या डोक्याला आणि जबड्यालाही मोठा मार लागला होता, तसेच अन्यही जखमा असल्याचे सरकारी वकील शिशिर हिरे यांनी स्पष्ट केले.

संशय घेण्यासारखे काही आहे का?
सर्व पक्षकारांचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने निकाल राखून ठेवला त्याच वेळी आम्हाला या प्रकरणात आताच कोणतेही निष्कर्ष काढायचे नाहीत; पण यात संशय घेण्यासारखे खरेच काही आहे का? हे तपासणे महत्त्वाचे असल्याचे न्यायालयाने निर्णय राखून ठेवताना नमूद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com