

पेट्रोल बॉम्बचा व्हिडिओ बाळगणे गुन्हा नव्हे!
उच्च न्यायालयाकडून आरोपीला जामीन मंजूर
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २८ : ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ (पीएफआय) या बंदी घातलेल्या संघटनेचा कथित सदस्य असलेल्या अर्जदाराला उच्च न्यायालयाने नुकताच जामीन मंजूर केला. न्यायालयाने त्याच्याविरोधातील साक्षीदारांचे जबाब निरुपद्रवी असल्याचे नमूद करून त्याच्या फोनवर पेट्रोल बॉम्ब बनवण्याची पद्धत दर्शवणारा व्हिडिओ असणे, हा गुन्हा नसल्याचे निरीक्षण नोंदवून जामीन मंजूर केला.
खटला लवकर संपण्याची शक्यता नसल्यामुळे मोहम्मद इक्बाल इब्राहिम खानला जामिनावर मुक्त करणे योग्य असल्याचे निरीक्षण न्या. सारंग कोतवाल आणि न्या. रणजितसिंह राजे भोंसले यांच्या खंडपीठाने आपल्या आदेशात नमूद केले. खानचा कथित गुन्ह्यांमध्ये सहभाग असल्याचे दर्शवणारा कोणताही ठोस पुरावा सादर करण्यास सरकारी पक्ष अपयशी ठरला. त्यामुळे खानविरोधात पोलिसांकडे नोंदवलेले साक्षीदारांचे जबाब निरुपद्रवी ठरत असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. खानवरील आरोपांवरून तो पीएफआयचा सदस्य होता; परंतु त्याच्यावरील ठेवण्यात आलेल्या कोणतेही गुन्हे सिद्ध होत नाहीत. खानच्या फोनवरील पेट्रोल बॉम्ब बनवण्याच्या पद्धतीचा व्हिडिओ विचारात घेतल्यास त्याने ती क्लिप इतर कोणालाही पाठवली नव्हती किंवा ती पद्धत वापरण्यासाठी कोणालाही प्रवृत्त केले नव्हते, असेही न्यायालयाने खानला जामीन देताना नमूद केले. तसेच याप्रकरणी मार्चमध्ये आरोप निश्चित केले असले तरी, आजपर्यंत एकाही साक्षीदाराची साक्ष नोंदवलेली नाही. किमान ९० साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात येणार आहे, त्यामुळे हा खटला भविष्यात वेळेत पूर्ण होण्याची शक्यता नसल्याचे स्पष्ट करून न्यायालयाने खानला जामीन मंजूर केला.
सरकारचा दावा
महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) खानला सप्टेंबर २०२२ मध्ये अटक केली होती आणि तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. त्याच्यावर भारतीय दंड संहिता आणि बेकायदा कारवाया प्रतिबंधच्या (यूएपीए) विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल केले होते. खान पीएफआयचा सक्रिय सदस्य होता. त्याने या प्रकरणातील इतर आरोपींसह भारताविरुद्ध बंड करण्याचा कट रचला होता आणि फेब्रुवारी ते जून २०२२ या काळात शहरात अनेक बैठका घेतल्याचा दावा सरकारकडून करण्यात आला. त्याच्या मोबाईल फोनमध्ये पेट्रोल बॉम्ब कसे बनवायचे, हे दाखवणारे व्हिडिओ सापडल्याचेही सरकारच्या वतीने न्यायालयाला सांगण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.