

आयआयटी मुंबईत वन महोत्सव
१०० रोपांची लागवड, वृक्षसंख्या ५० हजारांपार
मुंबई, ता. ३० : पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकासाच्या दिशेने सातत्यपूर्ण प्रयत्नांचा भाग म्हणून भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) मुंबईत शनिवारी (ता. २९) वन महोत्सव २०२६ उत्साहात साजरा करण्यात आला. संस्थेच्या कॅम्पसमधील वसतिगृह क्रमांक १५च्या मैदानावर आयोजित कार्यक्रमात कॅम्पस समुदायातील सदस्यांनी सामूहिक वृक्षारोपण केले.
आयआयटी मुंबईचे संचालक प्रा. शिरीष केदारे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या उपक्रमात विविध प्रजातींच्या १०० रोपांची लागवड करण्यात आली. वड (पिंपळ), प्राजक्त, शिरीष, सीता-अशोक, मोह, किंजळ, चंदन, कडुनिंब, गुंज, हिरडा आणि बिब्बा इत्यादी वृक्षांच्या रोपांचा यामध्ये समावेश होता. यंदाच्या वृक्षारोपणानंतर संस्थेच्या वन महोत्सव उपक्रमांतर्गत आतापर्यंत लागवड करण्यात आलेल्या वृक्षांची एकूण संख्या ५० हजारांहून अधिक झाली आहे.
वृक्षारोपण हा केवळ वार्षिक उपक्रम नसून, जैवविविधतेचे संरक्षण, हवामान बदलाचे परिणाम कमी करणे आणि पर्यावरणाबाबत जागरूक समुदाय घडविण्याची दीर्घकालीन बांधिलकी आहे. आज लावलेले प्रत्येक रोप हे निरोगी आणि शाश्वत भविष्यासाठी केलेली गुंतवणूक आहे, असे प्रा. शिरीष केदारे यांनी या वेळी सांगितले.
कार्यक्रमाला उपसंचालक प्रा. मिलिंद अत्रे, उपसंचालक प्रा. रवींद्र गुडी, अधिष्ठाता प्रा. वेदगिरी पेरुमल, सहयोगी अधिष्ठाता प्रा. प्रकाश नंथागोपलन यांच्यासह प्राध्यापक, विद्यार्थी व कर्मचारी उपस्थित होते. तसेच केंद्रीय विद्यालय आणि कॅम्पस स्कूलमधील शिक्षक व विद्यार्थ्यांनीही वृक्षारोपणात सहभाग घेतला.
या वेळी कॅम्पस स्कूल आणि केंद्रीय विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून दैनंदिन जीवनातील वृक्षांचे महत्त्व अधोरेखित केले. उपस्थितांना इस्टेट कार्यालयाच्या उद्यान विभागातर्फे विविध प्रकारच्या वनस्पतींच्या बियांचे वाटपही करण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.